पुणेकर ओढतात रोज सात सिगारेटचे झुरके ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

पुणेकर आठवड्यात दहा सिगारेटची पाच, तर महिन्याला 22 पाकिटे संपवण्याइतका धूर आणि धूळ फुफ्फुसामध्ये घेतात. शहरांमध्ये बेसुमार वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या प्रदूषणाचा हा थेट परिणाम आता पुण्यावर पडत असल्याचे दिसते. 

पुणे - पुण्यात चांगली, शुद्ध हवा असायची, असे म्हणण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. कारण, जवळपास सात सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर तुमच्या फुफ्फुसात जातो, तेवढाच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर रविवारी पुणेकरांनी आपल्या शरीरात घेतला. याच वेगाने पुणेकर आठवड्यात दहा सिगारेटची पाच, तर महिन्याला 22 पाकिटे संपवण्याइतका धूर आणि धूळ फुफ्फुसामध्ये घेतात. शहरांमध्ये बेसुमार वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या प्रदूषणाचा हा थेट परिणाम आता पुण्यावर पडत असल्याचे दिसते. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

पुण्याच्या हवेची गुणवत्ता किती ढासळली आहे, हेच यावरून अधोरेखित होते. मोबाईल फोनवरील "शूट! आय स्मोक' या ऍपमधून शहराच्या वेगवेगळ्या भागात हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म धूलिकणांची (पीएम 2.5) अद्ययावत माहिती यातून मिळते. याला भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतर्फे (आयआयटीएम) चालविल्या जाणाऱ्या "सफर'नेदेखील पुष्टी दिली आहे. पुण्यातील हवेची "बरी' ही वर्गवारी असल्याचे स्पष्ट केले. शहरात शिवाजीनगर येथील हवा सर्वाधिक प्रदूषित होती. त्या खालोखाल कात्रज, हडपसर, लोहगाव, भूमकर चौक येथील हवेची गुणवत्ता घसरली होती. 

असे केले "ऍप'ने गणित? 
हवेत तरंगणाऱ्या 2.5 मायक्रॉन प्रतिघन मीटर आकाराचे अतिसूक्ष्म धूलिकणांचा आणि सिगारेटमधून थेट फुफ्फुसात जाणाऱ्या धुराचा संबंध या "ऍप'ने गणितीय पद्धतीने जोडला आहे. एक सिगारेट म्हणजे "पीएम 2.5' चे 22 मायक्रॉन प्रतिघन मीटर प्रमाण. दिवसभरात 22 मायक्रॉन प्रतिघन मीटर प्रदूषित हवा श्‍वसनातून फुफ्फुसात जाणे म्हणजे एक सिगारेट ओढण्याच्या बरोबरीचे आहे. या प्रमाणात पुणेकरांनी शनिवारी दिवसभरात चार सिगारेट ओढल्या. 

- सूक्ष्म धूलिकण म्हणजे काय? 
"पीएम 10' म्हणजे 10 मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण. एक मिलिमीटरचा एक हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन. 
- अतिसूक्ष्म धूलिकण म्हणजे काय? 
"पीएम 2.5' याला अतिसूक्ष्म धूलिकण म्हटले जाते. त्यांचा आकार 2.5 मायक्रॉनपर्यंत असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune peoples smoking habit average 7 cigarettes per day

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: