Pune News : पेठांमधील सोसायट्यांमध्ये समस्यांचे ‘अतिक्रमण’; पार्किंगमध्ये दुकाने, खोल्या....

पेठांमधील वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. त्यातच अनेक सोसायट्यांमध्ये अनधिकृत दुकाने, खोल्या बांधून वहिवाटीचा रस्ता, पार्किंगची जागा काढून टाकण्याचे प्रकार समोर आले.
Society Parking Encroachment
Society Parking Encroachmentsakal

पुणे - पेठांमधील वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. त्यातच अनेक सोसायट्यांमध्ये अनधिकृत दुकाने, खोल्या बांधून वहिवाटीचा रस्ता, पार्किंगची जागा काढून टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. याविरोधात बांधकाम विभागाकडे तक्रार करून पाठपुरावा केल्यानंतरही अर्धवट कारवाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता उर्वरित अतिक्रमण पाडावे, यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पाठपुरावा करावा लागत आहे.

बुधवार पेठेत तांबडी जोगेश्‍वरी मंदिराच्यामागे स्वामी समर्थ गृहरचना संस्था आहे. सुमारे आठ गुंठ्यांच्या जागेत २१ सदनिकांची ही १९९५ मध्ये बांधलेली सोसायटी आहे. येथे सुमारे ४२ दुचाकी व ८० सायकलचे पार्किंग मंजूर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत येथे पार्किंग, साइड मार्जिनमध्ये अनधिकृतपणे दुकाने, खोल्या बांधून त्याचा व्यावसायिक वापर सुरू आहे.

गेल्या वर्षी सोसायटीचे कन्व्हेयन्स डीड झाल्यानंतर अध्यक्षांनी मे २०२३ मध्ये अनधिकृत बांधकामासंदर्भात बांधकाम विभागाकडे तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाने ३० डिसेंबरला कारवाईला सुरुवात केली. मात्र ही कारवाई अर्थवटच झाली.

साइड मार्जिनमध्ये पक्के बांधकाम केल्याने नागरिकांच्या घरात हवा, प्रकाश येऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे आता उर्वरित कारवाई करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा नवा संघर्ष सुरू झाला आहे. महापालिकेने सगळ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, अशी या सोसायटीतील सदनिकाधारकांची मागणी आहे.

कारवाई रोखण्यासाठी राजकीय हस्तक्षेप

महापालिकेची कारवाई रोखण्यासाठी कसबा मतदारसंघातील काही राजकीय पुढाऱ्यांनी रहिवाशांवर दबाव आणला. आम्हाला भेटायला या, असे निरोप पाठवले. पण पदाधिकाऱ्यांनी त्यास नकार देत कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका कायम ठेवली आहे.

त्यामुळे आता पुन्हा पाठपुरावा करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हा प्रश्‍न महापालिकेला सोडवावाच लागेल.

- राजश्री दीक्षित, अध्यक्ष, स्वामी समर्थ गृहरचना संस्था

ज्या नोटिशींची मुदत उलटून गेली होती, तेथे कारवाई केली असल्याचे उपअभियंत्यांनी सांगितले आहे. अनधिकृत बांधकामांना दिलेल्या नोटिसांची मुदत काही दिवस बाकी आहे. ती संपली की लगेच कारवाई करू, एकही अनधिकृत बांधकाम आम्ही ठेवणार नाही.

- प्रवीण शेंडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com