esakal | पुणे : डेंगीच्या रुग्णांना प्लेटलेटची चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

पुणे : डेंगीच्या रुग्णांना प्लेटलेटची चिंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांत डेंगीसह साथीचे इतर आजार वाढू लागल्याने रक्ताचा आणि पर्यायाने प्लेटलेटचा तुटवडा जाणवतो आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे रक्तदान शिबिरांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना आणि रुग्णालयांना रक्तासाठी धावपळ करावी लागते आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्या व डॉक्टरांतर्फे करण्यात आले आहे.

डेंगीसह चिकुनगुनिया आणि कर्करोगाच्या रुग्णांना उपचारांसाठी प्लेटलेटची गरज असते. रक्तातून मिळणाऱ्या प्लेटलेट केवळ ५ दिवस उपयुक्त असतात. परंतु, कोरोनामुळे रक्तदान शिबिरात सातत्य नसल्याने प्लेटलेटचा तुटवडा जाणवू लागला आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती सध्या निर्माण होत असल्याचे निरीक्षण सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. स्मिता जोशी यांनी नोंदवले. यावर उपाय म्हणून रक्तदान शिबिरांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्यासह ‘सिंगल डोनर प्लेटलेट’ (एसडीपी) हा एक पर्याय देखील उपलब्ध आहे. रक्तातून मिळणाऱ्या प्लेटलेटला ‘रॅन्डम डोनर प्लेटलेट’ (आरडीपी) म्हणतात. मात्र, याव्यतिरिक्त स्वतंत्र प्लेटलेट दान करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. ज्याला ‘एसडीपी’, असे संबोधले जाते. त्यामुळे सुदृढ नागरिकांनी नियमित रक्तदानासह प्लेटलेटचे दान करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

कोरोनामुळे सध्या नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे कठीण आहे. मात्र, प्लेटलेट वेळेत उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. यावर ‘एसडीपी’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कोरोनात ‘प्लाझ्मा डोनेशन’साठी नागरिकांनी पुढाकार घेतला, त्याप्रमाणे आता प्लेटलेट दान करण्यासाठी त्यांनी पुढे यावे.

– अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी

डेंगीची साथ सध्या वाढत असल्याने रक्ताची आणि प्लेटलेटची गरजही वाढली आहे. सातत्याने रक्तदान करणे, हाच त्यावरील उपाय आहे; अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे आम्हीदेखील रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहोत. नागरिकांनी त्याला प्रतिसाद द्यावा.

- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट

loading image
go to top