esakal | Pune Corporation : वाहनतळाच्या थकबाकीदार ठेकेदारांना दणका
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune Corporation : वाहनतळाच्या थकबाकीदार ठेकेदारांना दणका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या वाहनतळाचे कोट्यावधी रुपयांचे भाडे थकले तरी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांना दणका दिला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या ठेकेदारांवर न्यायालयात खटले दाखल करण्यास मान्यता दिली आहे. ‘सकाळ’ने वाहनतळाच्या कामकाजात कसा गोंधळ सुरू आहे हे समोर आणल्यानंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: किरकोळ महागाईत घट; केंद्राला मोठा दिलासा

शहरात महापालिकेचे ३० वाहनतळ आहेत. त्यापैकी १६ वाहनतळाच्या ठेकेदारांनी तब्बल ५ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी केली आहे. पैसे भरावेत यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना दाद दिली नाही. या ठेकेदारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. पण खोटे पत्ते दिल्याने ही कारवाई करता आली नाही. एकूणच शहरातील वाहनतळांच्या कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी जुनी थकबाकी वसूल कशी करायची हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला होता.

हेही वाचा: IMD : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने; राज्यातील काही भागातून माघार

याबाबत ‘सकाळ’ने पाच भागाच्या मालिकेतून ठेकेदारांची सुरू असलेल्या मनमानीबद्दल वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने गतीने कार्यवाही सुरू केली. वाहतूक नियोजन विभागाने या ठेकेदारांवर खटले दाखल करता येतील का याबाबत विधी विभागाचा अभिप्राय घेतला होता. त्यास हरकत नसल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई सुरू केली. खटले दाखल करताना त्यावर मुद्रांक शुल्क भरावा लागतो, त्यासाठी स्थायी समितीची मान्यता आवश्‍यक असल्याने आयुक्तांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्यास मान्यता देण्यात आली.

‘‘वाहनतळाची थकबाकी न भरणाऱ्या ठेकेदारांवर खटले दाखल करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे खोटे पत्ते देऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी देखील गुन्हे दाखल केले जातील.’’

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

loading image
go to top