
पुणे : कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी दुर्गंधी टाळण्यासाठी औषध फवारणी करण्याच्या कामासाठी महापालिका पाच वर्षात तब्बल ४९ कोटी ६३ लाख रुपये मोजणार आहे. त्यापैकी तब्बल २१ कोटी ८३ लाख १५ हजार ६२५ रुपयांचा खर्च हा कल्चर पावडरसाठी होणार असल्याचे ठेकेदाराने दाखविले आहे. त्यातुलनेत महापालिका गेल्या काही वर्षापासून वापरत असलेल्या कल्चर पावडरचा वापर स्वस्त ठरत आहे. त्यामुळे ठेकेदाराने प्रस्तावित केलेली पावडर वापरल्यास पाच वर्षात ११ कोटी ५२ लाख ७६ हजार १२५ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. भारतात अशा प्रकारचा प्रकल्प अन्य कोणत्याही शहरात झालेला नाही. हा प्रकल्प परवडणारा नसल्याने निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव घनकचरा विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे.