५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास योजना बंद; पीएमपीचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP Bus

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या डेपोपासून पाच किलोमीटरच्या अंतरासाठी ५ रुपये तिकिट आकारणी बंद झाली.

Pune PMP : ५ रुपयांत ५ किलोमीटर प्रवास योजना बंद; पीएमपीचा निर्णय

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या डेपोपासून पाच किलोमीटरच्या अंतरासाठी ५ रुपये तिकिट आकारणी बंद झाली असून, त्या मार्गांवर नेहमीप्रमाणे तिकिट आकारणी होणार आहे. त्यामुळे टप्प्यानुसार प्रवाशांकडून पाच ते दहा रुपये तिकिट आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा बदल २८ मार्गांवर होणार आहे.

पीएमपीने २५ ऑक्टोबर २०२० पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकिट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी ५६ मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे ते बंद करून २८ मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती. परंतु, बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता ५ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये तिकिट आकारणीमुळे पीएमपीने आर्थिक नुकसान होत होते. त्यातून संचलनातील तूटही वाढत होती. त्यामुळे या २८ मार्गांवर १९ फेब्रुवारीपासून नेहमीच्या दराने तिकिट आकारणी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

या मार्गांवर होणार नेहमीच्या दराने तिकिट आकारणी (डेपो आणि त्यातंर्गत मार्ग)

  • स्वारगेट - पुणे स्टेशन- ताडीवाला रस्ता, पुलगेट ते शीतल पेट्रोल पंप

  • नरवीर तानाजी वाडी - डेक्कन - गोखलेनगर, डेक्कन- नीलज्योती

  • कोथरूड - कोथरूड स्टॅंड ते कोथरूड स्टॅंड (वर्तुळाकृती मार्ग), गालिंदे पथ ते दांगट वस्ती, कर्वेनगर (गार्डन सिटी) ते कर्वेनगर (वर्तुळ)

  • कात्रज - जांभुळवाडी, नह्रेगाव, गुजरवाडी, येवलेवाडी, वाघजाईनगर

  • हडपसर - सासवड रोड रेल्वे स्टेशन, महंमदवाडी, फुरसुंगी, मांजरी, संकेतविहार, मांजरी बुद्रुक

  • अप्पर डेपो - मार्केटयार्ड- शत्रुंजय मंदिर (वर्तुळ), कात्रज- कोंढवा रोड- अप्पर डेपो

  • निगडी - निगडी- रूपीनगर, खंडोबामाळ ते चिखली

  • भोसरी - भोसरी- दिघी, चऱ्होलीगाव- आळंदी

  • पिंपरी - चिंचवडगाव - वाल्हेकरवाडी

  • बालेवाडी - चिंचवडगाव - आकुर्डी रेल्वे स्टेशन