
Pune News: अमेरिकी महिलेचे साडे पाच हजार डॉलर्स चोरीला, पौंड पोलिसांनी १२ दिवसांत आरोपीला शोधलं, पैसेही परत मिळवून दिले
Pune News : येथील 'आत्मंथन' येथे पाहुण्या आलेल्या अमेरिकी महिलेचे चोरीला गेलेले पाच हजार नऊशे त्रेचाळीस अमेरीकी डॉलर चोरीचा छडा पौड पोलिसांनी लावुन अमेरिकी महिलेला परत मिळवुन दिले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या डॉलर्सची भारतीय रुपयांमध्ये सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार तीनशे सव्वीस रुपये इतकी किंमत होत आहे. चोरीला गेलेली रक्कम परत मिळाल्याने परदेशी महिलेने पौड पोलिसांचे आभार मानले.
याबाबतची हकीकत अशी की, बीबी जमीना करीम, रा. अमेरीका, न्युयॉर्क, गयाना सिटी या फेब्रुवारी (ता.२५) रोजी पळसे येथील आत्मंथन येथे पाहुण्या म्हणुन आल्या होत्या.
येथील मुक्कामा दरम्यान त्यांच्याकडचे ५९४३ अमेरीकी डॉलर चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी व्यवस्थापनाला कळवली.
याबाबत त्यांचेवतीने आत्मंथनचे सिक्युरीटी इंचार्ज भालचंद्र श्रीधर जाधव यांनी (ता.२६) पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच पौडचे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
तातडीने तपासपथक नेमुन तपासाबाबत सुचना दिल्या. या ठिकाणी कामास असलेला विजय पटोई रा. मुंबई टीटवाला याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत सखोल चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
त्यामुळे आरोपी विजय यास पोलिस कस्टडी घेऊन चोरीचा तपास पुर्ण करण्यात आला. आरोपी विजय कडुन ५९४३ अमेरिकी डॉलर हस्तगत करण्यात आले. आरोपी विजय यास कोठडी देण्यात आली.
मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर नंबर ७, पुणे यांच्या आदेशानुसार काल बुधवारी (ता.८) बीबी जमीना करीम यांना त्यांचे अमेरिकी डॉलर परत करण्यात आले. अवघ्या दहा-बारा दिवसांत चोरीचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन चलन परत केल्याबददल जमीना करीम यांनी पौड पोलिसांचे आभार मानले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक पुणे विभाग मितेश गट्टे, हवेली विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, सहायक उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, पोलीस नाईक नामदेव मोरे, दत्तात्रय अर्जुन, पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख, आकाश पाटील, अक्षय यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पौड (ता.मुळशी) ः अमेरिकी महिला बीबी जमीना करीम यांना त्यांचे अमेरिकी चलन परत करताना पोलिस निरीक्षक मनोज यादव (डावीकडून पहिले), जमीना करीम (मध्यभागी) , सहायक निरीक्षक भालचंद्र शिंदे (उजवीकडून पहिले).