सराईताकडून चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

सराईताकडून चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त
Published on: 

पुणे, ता. १८ : वाघोली परिसरातील केसनंद भागात पोलिसांनी गोव्यातील दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले आणि १५ जिवंत काडतुसांसह सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आकाश ऊर्फ गज्या अशोक मोरे (वय २१, रा. वडगाव शेरी, पुणे), मनीष दिलीप फर्नांडिस (वय २६) आणि चंद्रेश्वर मल्लेशी चारी (वय २१, दोघे रा. चांदोर, मडगाव, दक्षिण गोवा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तसेच, एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिस ठाण्याचे तपास पथक सोमवारी (ता. १६) केसनंद भागात गस्त घालत होते. त्या वेळी जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन-चार संशयित तरुण दोन दुचाकींसह थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तुले असल्याची माहिती पोलिस कर्मचारी प्रदीप मोटे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर राघू आणि पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चार पिस्तुले, चार मॅगझिन, १५ जिवंत काडतुसे आढळून आली. याशिवाय पोलिसांनी २० हजार रुपयांची रोकड, दोन दुचाकी आणि चार मोबाइल असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.