

पुणे, ता. १६ : नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत तब्बल एक हजार १०० पानी दोषारोपपत्र शनिवारी न्यायालयात दाखल केले. घटनाक्रम, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल असे महत्त्वाचे पुरावे दोषारोपपत्रात जोडले आहेत.
या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. नसरापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन आणि पुण्यात मूक मोर्चा काढला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी रात्री दोषारोपपत्र सादर केले. यावेळी गिल, विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विजयमाला पवार उपस्थित होत्या.
एक मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे आरोपी भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा वेगाने तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. तपासादरम्यान आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना (रिक्रिएशन) केली. आरोपी घटनास्थळी कसा पोहोचला, चिमुकली कुठे खेळत होती, तिला कोठून नेले आणि गोठ्यात अत्याचार नेमका कुठे झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी पुन्हा उभा केला.
तपासादरम्यान परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे गोळा केले. ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. घटनेच्या वेळी परिसरात लपाछपी खेळणाऱ्या १० ते ११ वर्षे वयोगटातील दोन मुलांनी आरोपीला गोठ्याकडे जाताना पाहिल्याचे समोर आले असून, हे दोघे महत्त्वाचे साक्षीदार ठरणार आहेत. दोषारोपपत्रात बालिकेचा शवविच्छेदन अहवालही जोडला आहे. आरोपीने बालिकेच्या तोंडात बोळा कोंबल्याचे, तसेच तिच्या शरीरावर जखमा आढळल्याचे नमूद केले आहे.
दोषारोपपत्रात असलेले पुरावे
- घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
- ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब
- घटनेचे ५० हून अधिक फोटो
- वैद्यकीय पुरावे
- न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल
- घटनाक्रमाचे वर्णन
- आरोपीने दिलेला जबाब
- तांत्रिक तपास व त्याचे अहवाल
‘‘आरोपीवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. तांत्रिक कारणांमुळे त्या गुन्ह्यांत त्याची सुटका झाली. मात्र, या गुन्ह्यात त्याच्याविरोधात सक्षम पुरावे आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत अचूक तपास केला आहे. त्यामुळे मुलीला न्याय मिळणार आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात इतक्या कमी वेळेत दोषारोपपत्र दाखल झाल्याची पहिलीच वेळ असावी.’’
- अजय मिसर, विशेष सरकारी वकील
‘‘आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी आवश्यक त्या कलमांनुसार गुन्ह्याचा तपास केला आहे. गुन्ह्याचा अत्यंत नैसर्गिक पद्धतीने तपास झाला असून, त्यासाठी आमची टीम गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने कार्यरत होती. कायदेशीर बाबी तपासून दोषारोपपत्र तयार केले आहे. कमीत कमी वेळेत मुलीला न्याय मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
- संदीपसिंग गिल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.