esakal | पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत नऊ हजार जणांना ई-पास

बोलून बातमी शोधा

E-Pass
पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत नऊ हजार जणांना ई-पास
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने 15 मे पर्यंत लॉकडाऊन सुरु ठेवण्याचा नवा आदेश दिल्याने आता ई -पासची सेवा देखील 15 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. अत्यावश्‍यक कारणासाठी परराज्यात व दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या नागरीकांसाठी ई-पास उपलब्ध होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आत्तापर्यंत नऊ हजार 363 जणांना पुणे पोलिसांनी ई-पास दिले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 22 एप्रिलपासून नागरीकांना अत्यावश्‍यक कामांसाठी परराज्यात किंवा अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी पुणे पोलिसांकडून ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पहिल्या दिवशी दोन हजार 77 जणांनी ई-पाससाठी अर्ज केले होते. त्यापैकी 286 जणांना ई-पास मंजुर करण्यात आले होते. त्यानंतर दिवसेंदिवस ई-पाससाठीची मागणी वाढत गेली. महत्वाच्या कारणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरीकाची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यादृष्टीने पुणे पोलिसांकडून पास देण्यास प्राधान्य देण्यात येत होते. दरम्क्षान, 2 मे रोजी लॉकडाऊन संपणार असल्याने ई-पास सुरू राहणार की बंद होणार याबाबत नागरीकांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात होते.

दरम्यान, गुरूवारी राज्य सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे आदेश काढले. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याचा उल्लेख करून ई-पासची सेवा देखील 15 मेपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुणे पोलिसांकडे एकूण नागरीकांनी अत्यावश्‍यक कारणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी 32 हजार 315 अर्ज सादर केले होते. त्यापैकी 9 हजार 363 जणांच्या अर्जांना पोलिसांनी मंजुरी दिली. तांत्रिक कारणांमुळे चार हजार 30 अर्ज बाद झाले. कागदपत्र अपुर्ण असणे किंवा अन्य कारणांमुळे 16 हजार 375 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तर दोन हजार 547 अर्ज प्रलंबित आहेत. याविषयी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे म्हणाले,

"नागरीकांना वेगवेगळ्या कारणांसाठी पासची गरज आहे. त्यानुसार, विविध अत्यावश्‍यक कारणांसाठी नागरीकांना ई-पास उपलब्ध करून दिले जात आहेत.''

हेही वाचा: पुणे मनपातील अधिकाऱ्यांची 'रंगीत ओली पार्टी'; पोलिसांच्या छाप्यात 9 जण अटकेत

ई-पाससाठी नागरीकांची कारणे

- तत्काळ वैद्यकीय कारणासाठी बाहेरगावी जाणे

- जवळच्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार, लग्न

- जवळचे नातेवाईक आजारी असणे

- नागरीकांना परदेशात जाण्यासाठी मुंबई विमानतळावर जाणे

- कार्यालयीन कामानिमित्त जिल्ह्याबाहेर जाणे

ई-पास हवाय, तर इथे करा अर्ज - covid19.mhpolice.in

"लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यात व परराज्यात जाण्यासाठी आवश्‍यक ई-पासला 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत 9 हजार जणांना ई-पास देण्यात आले आहेत. महत्वाचे काम असेल, तरच नागरीकांनी बाहेर पडावे, अन्यथा घरीच थांबावे.''

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्‍त