

Pune Police Transition to 'Smart Policing
Sakal
ज्ञानेश्वर भोंडे
पुणे, ता. ३१ : पुण्यातील पोलिस दलाची यंत्रणा गेल्या काही वर्षांत वेगाने ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे वळली आहे. सीसीटीव्ही नेटवर्क, सायबर ट्रॅकिंग, माहितीचे विश्लेषण आणि डिजिटल मॉनिटरिंग या तांत्रिक बाबींच्या मदतीने गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले असले, तरी या प्रक्रियेत पोलिसांचा खासकरून पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, बीट अंमलदार यांचा त्यांच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, खबरी यांच्यासोबतचा असलेला संवादही हरवत आहे. परिणामी, गुन्हा घडण्याआधी खबर मिळत नसल्याने त्या गुन्ह्याला प्रतिबंध होत नाही. तसेच पोलिस सर्वसामान्यांमध्ये मिसळत नसल्याने आपोआप न कळत होणारे पोलिसिंगही कमी झाल्याचे दिसून येत आहे.