Pune : गुंगारा देणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : गुंगारा देणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश

नारायणगाव : घरफोडी, दान पेटी व मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या व पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठकवण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपींनी आंबेगाव तालुक्यातील गिरवली व घोडेगाव येथील भैरवनाथ मंदिराची जुलै व ऑक्टोबर महिन्यात चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.

या प्रकरणी नवनाथ विजय पवार ( वय.२१ वर्ष , राहणार साकुर माळवाडी ता. संगमनेर जि.अ. नगर , मनोहर गोपीनाथ केदार ( वय २६ वर्ष रा. चिखलठान बोंबीलदरा ता. राहुरी ) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी गिरवली(ता. आंबेगाव), गावच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराच्या सभा मंडपाचे कुलूप तोडून चोरी केली होती. त्या नंतर ६ ऑक्टोबर २०२२ रोजी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडेगाव - मंचर रस्त्या लगत असलेल्या भैरवनाथ मंदिरामध्ये रात्रीच्या वेळेस प्रवेश करून दानपेटी मधील रोख रक्कम चोरून नेली होती.

आंबेगाव तालुक्यातील दोन जागृत देवस्थानची लागोपाठ दोन चोऱ्या झाल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या होत्या. या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, फौजदार गणेश जगदाळे, हवालदार दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर आरोपींचा शोध घेत होते. गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला माहितीच्या आधारे टाकळी हाजी परिसरामध्ये सापळा लावून आरोपींना अटक करण्यात यश आले. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना घोडेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.