विरोधकांना प्रखर प्रत्युत्तर द्या

विरोधकांना प्रखर प्रत्युत्तर द्या
Published on

पुणे, ता. ९ : ‘‘दिल्लीपासून गल्लीपर्यंतची राजकीय परिस्थिती बदलत आहे. विरोधक आपल्यावर तुटून पडत असताना नगरसेवकांनी त्यांना प्रखर प्रत्युत्तर दिले पाहिजे. केवळ प्रभागापुरता विचार न करता पक्ष म्हणून भूमिका मांडा आणि आपल्याविरोधात नॅरेटिव्ह सेट होऊ देऊ नका,’’ अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजप नगरसेवकांचे कान टोचले.
पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मोहोळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मोहोळ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मोहोळ म्हणाले, ‘‘पुण्याची लोकसंख्या ६० ते ७० लाख झाली आहे. या सर्वांचे तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात. ज्यावेळी तुम्ही महापालिकेच्या सभागृहात बोलता, त्यावेळी स्वाभाविकपणे आपापल्या प्रभागातल्या कामाच्या अडचणी, समस्या, विकास प्रकल्पांना प्राधान्य देता, यात काही गैर नाही. अधिकारी काम करत नाहीत, आमचे ऐकत नाहीत, अशा मानसिकतेत जाऊ नका. आपण सत्ताधारी आहोत हे लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने काम करा. तुम्हाला पदाधिकाऱ्यांकडून सर्व सहकार्य केले जाईल. तुम्हाला प्रत्येकाला निधी दिला आहे, त्यातून कामे होतील. तुम्हाला जास्त निधी दिला म्हणजे पुढच्या निवडणुकीसाठी तुमची उमेदवारी निश्‍चित आहे, असे मानू नका. महापौरांनी माझे काम केले पाहिजे, सभागृहनेत्यांनी आपल्याला हवा असलेला ठराव केला पाहिजे, स्थायी समिती अध्यक्षांनी प्रस्ताव मंजूर केला पाहिजे. जशी तुमची अपेक्षा आहे, तसेच मी पक्षासाठी काय केले, याचाही विचार नगरसेवकांनी केला पाहिजे.’’
विरोधक आपल्यावर तुटून पडत असताना किती नगरसेवक त्यांच्या टीकेला उत्तर देतात, सोशल मीडियावर तुम्ही स्वतःशिवाय पक्षासाठी काहीच व्यक्त होत नाही. माझा प्रभाग सांभाळून मला शहरासाठी, पक्षासाठी काय करता येईल याचा विचार करा. आपल्याला जे विषय करायचे आहेत, ते विषय विरोधक मांडत आहेत, त्यावर आपल्या सदस्यांच्या स्वाक्षरी असतात. असे प्रस्ताव कसे मंजूर होतात, आपण याचाही विचार करा. महापालिकेची सर्वसाधारण सभा एक दिवसाऐवजी जास्त दिवस चालवा, अशी सूचना आहे. परंतु, त्यात आपली पूर्णवेळ किती उपस्थिती असते. कमी उपस्थितीमुळे गणसंख्या नसल्याने विरोधक ओरडतात, त्यावेळी आपल्यावर नामुष्की येते. हे वर्तन योग्य नाही, असे मोहोळ यांनी बजावले.

मोहोळ म्हणाले...
- विरोधकांना रोखण्यासाठी टीम करा
- एकमेकांचा सन्मान करा, संवाद वाढवा
- सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com