esakal | पोटची मुलं गेली पण आजी खचली नाही; नातवांसाठी राबण्याची जिद्द वाखाणण्याजोगी

बोलून बातमी शोधा

पोटची मुलं गेली पण आजी खचली नाही; नातवांसाठी राबण्याची जिद्द वाखाणण्याजोगी
पोटची मुलं गेली पण आजी खचली नाही; नातवांसाठी राबण्याची जिद्द वाखाणण्याजोगी
sakal_logo
By
महेश जगताप

पुणे : होय, माझी दोन तरणीताठ पोरं मरण पावली. एकला जाऊन दहा वर्षे लोटली तर एक गेल्या सहा महिन्यात गेला. आत्ता माझ्यावरच सगळी नातवंडांची जबाबदारी पडली आहे. पण या जबाबदारीचं मला ओझं नाही. कारण आजपर्यत कष्टातूनच मी उभी राहिली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी नातवंडांना चांगलं शिक्षण देणार आहे. लोकांची मदत किती दिवस टिकणार? त्यामुळे मलाच हातपाय हलवावे लागणार. पुन्हा मी कष्टाच्या जीवावर उभी राहणार आहे, अशा संघर्षशील भावना 'सकाळ'शी बोलताना शांताबाई दारवाटकर यांनी व्यक्त केल्या. अश्या संकटातही धाडसाने उभ्या राहणाऱ्या आजीचं तुम्हाला कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. या आजी गेली सतरा वर्ष बाजीराव रोड लगत उकडलेली देशी अंडी विकत आहेत. साधारण रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेल्या असतात. उकडलेली अंडी घेण्यासाठी लांबून लांबून ग्राहक आजीकडे येत असतात. अगदी हक्काने पैसे जरी तुमच्याकडे नसले तरी चार आठ दिवस पैशासाठी थांबणारी आजी मात्र फार बोलकी, सडसडीत आवाजात करारीपणा असणारी आहे.

हेही वाचा: बारामतीत कोरोना पेशंटचे नातेवाईक हैराण; रेमडीसिवीर इंजेक्शनच मिळेना

या आजीकडे स्पर्धा परीक्षा करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात येत होता. पण रोगराईमुळे विद्यार्थी वर्ग गावाकडे असल्याने त्याचबरोबर लॉकडाऊन मुळे येणारा ग्राहक ही बंद झाला आहे. तरीही थोडीफार तर अंडी विकली जातील या आशेने आजी बाजीराव रस्त्यावर अंडी घेऊन बसलेल्या असतात. पण दोन तरणीताठ पोर गेल्यापासून थोडं खचल्यासारखं वाटलं होतं, पण पुन्हा जबाबदारीची आठवण आली. आपणच खचून बसल्यावर या लहान पोरांना कोण खायला घालणार, यांचं शिक्षण कोण करणार? वय झालंय, थोडा थकवा पण आल्यासारखा वाटतोय, पण थकून चालणार नाही. पुन्हा नव्या उमेदीने विस्कटलेले घर उभा करायचं आहे. लोकांच्या मदतीने किती दिवस घर चालणार मलाच हातपाय हलवावे लागणार असे मत शांताबाई दारवाटकर यांनी व्यक्त केले .