

पुणे, ता. १३ : पुण्यातील रस्त्यांवरून दुचाकी चालवताना खड्डा चुकविण्यासाठी अचानक ब्रेक दाबणे, खड्ड्यातून मोटार गेल्यानंतर बसणारा जोराचा हादरा, गतीरोधक, असमान पातळीतील रस्त्यांमुळे पुणेकरांना प्रचंड त्रास होतो. यासाठी शहरातील खड्डे शोधण्यासाठी महापालिकेने एथर कंपनीच्या २४ हजारांहून अधिक कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकींमधून रस्त्यांची स्थिती जाणून घेतली. त्यात अवघ्या एका आठवड्यात तब्बल ९३ लाख हादरे दुचाकीस्वारांना बसल्याचे समोर आले आहे. आता हे हादरे नेमके खड्ड्यांमुळे बसले आहेत की अन्य कोणते कारण आहे, याचा शोध महापालिका घेत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे होणारे हाल, नागरिकांच्या तक्रारी आणि वारंवार होणारी रस्त्यांची दुरवस्था यावर अद्याप ठोस उपाय सापडलेला नाही. पीएमसी ॲपवर तक्रारी करूनही अनेकदा खड्डे बुजविण्यास विलंब होतो. माध्यमांमधून प्रश्न उपस्थित केले जातात, तर नगरसेवकही सभागृहात प्रशासनाला जाब विचारतात. खड्डे बुजविण्यासाठी पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तरीही रस्त्यांची परिस्थिती बदललेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने एथर कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. कंपनीच्या दुचाकींमधील तंत्रज्ञानाच्या आधारे रस्त्यांवरील अडथळ्यांची जीपीएससह माहिती हस्तांतर केली जात आहे.
एथर कंपनीने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातील सात दिवसांची माहिती महापालिकेला सादर केली आहे. त्यात शहराच्या सर्व भागात ९३ लाख हादरे जाणवल्याची नोंद झाली आहे. मात्र, हे सर्व हादरे खड्ड्यांमुळेच बसलेले नाहीत. रस्त्यांवरील गतिरोधक, खचलेली चेंबर, खोदकामानंतर केलेली दुरुस्ती, उड्डाणपुलांवर दोन गर्डरना जोडणारा भाग, रंबल स्ट्रिप्स, गर्दीच्या रस्त्यांच्या कडेने वाहन चालविताना बसणारे धक्के आणि अडथळा आल्याने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसलेले हादरे यांचा यात समावेश आहे.
७८ अभियंत्यांवर जबाबदारी
कंपनीने दिलेल्या माहितीचे विश्लेषण करून प्रत्यक्ष जागा पाहणी करणे, जेथे हादरा बसला आहे तेथे खड्डा आहे की अन्य काही अडथळे आहेत हे पथ विभागातील ७८ कनिष्ठ अभियंते तपासणार आहेत. त्यांची छायाचित्रे ते सिस्टीममध्ये अपलोड करणार आहेत. त्यामुळे खराब रस्ते चांगले झाले आहेत की नाही, हेदेखील तपासता येणार आहे.
महापालिकेने एथर कंपनीसोबत केलेल्या करारानुसार पहिल्या आठवड्यातील हादऱ्यांची माहिती मिळालेली आहे. त्यात ९३ लाख हादऱ्यांची नोंद झाली असून, हे हादरे का बसले आहेत याचा आम्ही शोध घेऊ. त्यानुसार शहरात रस्ते दुरुस्ती व अन्य उपाययोजना केल्या जातील.
- प्रजीत नायर,
अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.