Pune: जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींकडून रोजगार हमीचे एकही काम नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगार हमी

पुणे : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींकडून रोजगार हमीचे एकही काम नाही

पुणे, ता. १६ ः जिल्ह्यातील गावा-गावांत रोजगार हमीची कामे वाढावीत, गावातील प्रत्येक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे आणि आपापल्या गावातील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी गावपातळीवर नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांच्या भरतीसाठी ग्रामपंचायती अनुत्साही असल्याचे दिसून आले आहे. आजही जिल्ह्यातील ५२३ गावांनी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली नसल्याचे उघडकीस आले आहे. याचा गावातील रोजगार हमीच्या कामांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. पुणे जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींनी रोजगार हमीची एकही काम सुरु केले नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

विशेषतः या पदावर काम करणारे तरुण असतात. त्यातच या कामांच्या बदल्यात मिळणारा मोबदला खूप कमी असतो. त्यामुळे सहसा या पदावर काम करण्यास युवक उत्साही नसतात. त्यामुळे ही पदे रिक्त झाली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

गावेच गावांच्या विकासाचे शिल्पकार व्हावेत, या उद्देशाने केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील तरतुदीनुसार गावनिहाय ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्याची तरतूद केली आहे. यामुळे गावा-गावात रोजगार हमीची कामे वाढू शकतील, गावातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. पर्यायाने गावातील विकासकामे ही मार्गी लागून, गावांचा विकास होण्यास मदत होईल, अशी यामागची केंद्र सरकारची भावना आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक स्थिती

- जिल्ह्यातील एकूण जागांची संख्या --- १ हजार ३७६

- आतापर्यंत भरलेल्या जागा --- ८५३

- सध्या रिक्त असलेल्या जागा --- ५२३

- सध्या रोजगार हमीची शून्य कामे सुरु असलेल्या गावांची संख्या --- १९४

ग्रामरोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या

- रोजगार हमी योजनेसाठी कामांचा शोध घेणे

- गावातील बेरोजगारांना रोजगार हमीच्या कामांवर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे

- रोजगार हमीच्या योजनांसाठी गावातील पात्र नागरिकांचा शोध घेणे

- रोजगार हमीच्या कामांसाठी ग्रामसेवकाला मदत करणे

- गाव पातळीवरील रोजगार हमीची सर्व कागदपत्रे तयार करणे

- रोजगार हमीच्या मजुरांचे हजेरीपत्रक सांभाळणे

भरतीसाठी पात्रता व भरती प्रकिया पद्धती

- गावातील तरुण व बेरोजगार युवक असावा.

- किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक.

- बारावी उत्तीर्ण असलेल्यांना प्राधान्य.

- संगणक हाताळणी येणे बंधनकारक.

- संगणकाबाबतची एमएस-सीआयटी किंवा त्या समकक्ष असणारी परीक्षा उत्तीर्ण असावी.

- ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र युवकाची निवड केली जाते.

दरमहा प्रत्येकी मिळणारे मानधन (मनुष्यदिन)

- १ हजार मनुष्यदिनसाठी --- मजुरांना वाटप केल्या जाणाऱ्या एकूण मजुरीच्या सहा टक्के

- १ हजारांपासून पुढे व २ हजार मनुष्यदिनाच्या आत --- चार टक्के

- २ हजारांहून अधिक मनुष्यदिन --- २.२५ टक्के

मनुष्यदिन म्हणजे काय?

गावातील बेरोजगारांना किंवा मजुरांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या दिवसांना मनुष्यदिन म्हटले जाते. यानुसार दिवसाच्या मोबदल्यासाठी निश्‍चित केलेल्या केलेल्या कालावधीला एक मनुष्यदिन म्हटले जाते. उदाहरणार्थ एका दिवशी दहा मजुरांना रोजगार हमीचे काम उपलब्ध करून दिले तर, ते त्या दिवसाचे दहा मनुष्यदिन झाले, असे म्हटले जाते.

पुणे जिल्ह्यातील सुमारे एक हजार २०० गावांमध्ये ग्रामरोजगार सेवकांची पदे रिक्त होती. गेल्या दीड वर्षापासून सातत्याने ही पदे भरण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ८५३ पदे भरली आहेत. उर्वरित रिक्त पदे त्वरित भरण्याचा आदेश ग्रामपंचायतींना दिला आहे.

- आयुष प्रसाद,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद, पुणे.

loading image
go to top