
German Bakery Blast: 12 वर्षांपूर्वी पुणे एका बॉम्बस्फोटामुळे हादरलं होतं
आज सकाळी पुणे स्टेशनवर बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. आणि सगळ्यांचे श्वास रोखले. पोलिसांचा ताफा जमा झाला आणि तपास सुरू झाला. आढळलेली बॉम्बसदृश्य वस्तू निकामी करण्यात आली असून या वस्तूमध्ये बॉम्बसारखे काही आढळले नाही. दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांचा हा प्रकार आहे असं पोलिसांनी सांगितलं आणि पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यामागे कुणाचा मोठा स्फोट घडवण्याचा हेतू होता का याचा तपास पोलिस करत आहेत. पण 12 वर्षापूर्वी पुणे शहर एका बॉम्बस्फोटामुळे हादरलं होतं. ज्यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला होता. आपल्याला आठवतंय? पुणे स्टेशन परिसरात बॉम्ब असल्याची बातमी आली अन् 12 वर्षापूर्वीच्या त्या वेदनादायी आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
13 फेब्रुवारी 2010 चा दिवस. संध्याकाळची वेळ. पुण्यातील कोरेगाव पार्क तसा फेमस एरिया. तेथील जर्मन बेकरीजवळ लोकांची वर्दळ रोजच्यासारखीच होती. संध्याकाळची साधारण साडेसहा पावणेसातची वेळ. नेहमीप्रमाणे लोकांची आणि ग्राहकांची गर्दी होती. कामगार आपापल्या कामात व्यस्त होते. अन् सायंकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी अचानक कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. काय झालंय काही कळत नव्हतं. सगळं काही क्षणात उध्वस्त झालं होतं. आजूबाजूला बघितलं तर सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बाहेर लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. बघता बघता लोकांची गर्दी जमा झाली. पोलिसांच्या गाड्या आल्या. तपास सुरू झाला. मृतांनी आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह हळूहळू बाहेर काढले जात होते. एक-दोन-तीन....नव्हे, तब्बल 18 मृतदेह.

German Bakery Bomb
कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात तब्बल 18 निष्पाप जिवांचा बळी तर 60 जण जखमी झाले होते. अज्ञात दहशतवाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं तपासातून पुढं आलं. पुढच्या सखोल तपासात आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडलीने 2008 मध्ये पुण्यात दोन दिवस कोरेगाव पार्कमध्ये वास्तव्य केल्याचं उघड झालं. स्फोट होण्यापूर्वी सुमारे दोन-चार वर्षे ‘लष्करे तोयबा’ या दहशतवादी गटाशी जवळीक असलेला ‘इंडियन मुजाहिदीन’ हा दहशतवादी गट पुण्यात सक्रिय असल्याचंही समोर आलं. त्यानंतर या स्फोटातील मुख्य सूत्रधार यासीन भटकळ आणि त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Criminal's In German Bakery Bomb Blast
रिक्षाने बॉम्ब नेला होता जर्मन बेकरीत
जर्मन बेकरीत स्फोट घडविण्यापूर्वी सूत्रधार यासीन भटकळ पुण्यातील कात्रज भागात राहायला होता. एका खोलीत त्याने बॉम्ब तयार केला. तेथून तो रिक्षाने स्वारगेटला पोहचला. तेथून त्याने तो बॉम्ब दुसऱ्या रिक्षाने जर्मन बेकरीपर्यंत नेला. कात्रज-स्वारगेट रिक्षा प्रवासात यासीन बॉम्ब काळजीपूर्वक घेऊन जात होता. त्यामुळे रिक्षातील एका प्रवाशाने त्याला विचारलेही होते, ‘अरे भाई, ये क्या है, इसमे बॉम्ब तो नही,’ हे ऐकताच यासीन घाबरला होता. पकडल्यावर झालेल्या चौकशीत त्यानेच ही माहिती पोलिसांना सांगितली होती.

German Bakery Blast
पुण्यात अजूनही झाला होता बॉम्बहल्ल्याचा प्रयत्न
जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1 ऑगस्ट 2012 रोजी जंगली महाराज रस्त्यावरील पाच ठिकाणी बॉम्ब घडवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो पुणे पोलिसांकडून उधळण्यात आला होता. तपासादरम्यान एक जिवंत बॉम्बही हस्तगत करण्यात आला होता. त्याअगोदर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही स्फोट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण सतर्क फुलविक्रेत्यामुळे तो प्लॅन अयशस्वी ठरला होता. त्यानंतरच्या तपासात पुण्यातील ओशो आश्रम, छबाड हाऊस, लाल देऊळ हे ठिकाणेही दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचं उघड झालं होतं.

पुण्यात आज रेल्वे स्थानकावर सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूची पाहणी करताना बॉम्बशोधक पथक
तपास यंत्रणांचा पुण्यातील वावर वाढला
2008 मध्ये पुण्यातील कोंढव्यातून इंडियन मुजाहिदीनच्या 12 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि पुणे राष्ट्रीय नकाशावर आले. पुणे शहराचा वाढता व्याप आणि दहशवाद्यांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता पुण्यात ATSच्या पथकात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर राज्य गुप्तवार्ता विभाग (SID), केंद्रीय गुप्तचर विभाग (IB), राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (NIA) यांच्याही पुण्यातील पथकांत वाढ झाली. ‘NIA’चेही पुण्यात कार्यालय स्थापन झाले आहे. दरम्यानच्या काळात मुंबई, दिल्ली, बंगळूर, लखनऊ, बिहार या राज्याच्या एटीएस पथकांचाही शहरातील वावर वाढला होता.
Web Title: Pune Railway Station German Bakery Bomb Blast Case 18 Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..