
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटानंतर आता यार्डमध्ये देखील आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. आरपीएफ आणि सिग्नलिंग विभागाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी जागेचे सर्वेक्षण केले जात आहे. पुणे स्थानकाच्या दोन्ही यार्डमध्ये सुमारे वीसहून अधिक कॅमेरे बसविले जाणार आहे. यामुळे बेकायदा रूळ ओलांडणे, प्रवासी सुरक्षा व रेल्वे मालमत्तेचे संरक्षण होण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वी सोलापूर दिशेने असलेल्या यार्डमध्ये रेल्वेच्या डब्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.