Pune: पुण्यातील पुरावरून माजी महापौरांनी राष्ट्रवादीला फटकारले, "अकलेचे तारे..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murlidhar Mohol

Pune: पुण्यातील पुरावरून माजी महापौरांनी राष्ट्रवादीला फटकारले, "अकलेचे तारे..."

पुणे : शुक्रवारी राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी पुणे शहरात दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे रस्त्यावर पाणी आले. पुण्यातील वर्दळीचा रस्ता असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर आणि कर्वे रस्त्यावर चक्क पूरासारखे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपवर टीका करत रस्तावरील पाण्याचे खापर भाजपवर फोडले आहे.

(BJP vs NCP News)

दरम्यान, "राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे महापालिकेचे वाट लागली आहे" अशी टिप्पणी माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी केली होती. या टीकेला माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले असून राष्ट्रवादीला फटकारले आहे. "ज्यांच्या सत्ताकाळात पुण्याच्या शहर नियोजनाचे बारा वाजले, बांधलेले उड्डाणपूल पाडावे लागले, त्याच राष्ट्रवादीने भाजपवर तोंडसुख घेणे म्हणजे जरा अतिच झालं" अशा शब्दांत मोहोळ यांनी फटकारले आहे.

"शिवाजीनगर परिसरात आज दुपारनंतर तब्बल ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली. साधारणपणे दिवसभरात पडणारा पाऊस अवघ्या दोन तासात पडल्याने शिवाजीनगरच्या काही भागात काही वेळासाठी रस्त्यावरुन पाणी वाहिले. काही वेळातच त्या पाण्याचा निचरा झालाही, पावसाचा बदलता ट्रेंड लक्षात घेऊन भविष्यकालीन नियोजन आपण करणारही आहोत. पण प्रत्येक विषयात राजकारण आणणाऱ्या राष्ट्रवादीने यावरून अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली" असं म्हणत मोहोळ यांनी राष्ट्रवादीला फटकारले आहे.

मोहोळ पुढे म्हणाले की, "पुण्यातील सांडपाणी व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे, पण ही व्यवस्था गेल्या पाच वर्षातच निर्माण केली गेलीय, असं भ्रामक चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरु केला. गेल्या ३०-४० वर्षांत पुण्याचं काय झालं? आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षांत पुणे शहरासाठी काय केलं? हे पुणेकर जाणतात. त्यामुळे राजकीय आरोपांनी भाजपला बदनाम करता येईल, असे वाटत असेल तर राष्ट्रवादीचा भ्रमाचा भोपळा फुटेल. उदाहरणच सांगायचं झालं तर, आंबिल ओढ्याची समस्या सोडावायला आपल्याला आलेलं यश. भाजपच्याच सत्ताकाळात आंबील ओढा आणि परिसरात केलेल्या प्रभावी उपाययोजना आणि व्यवस्थापनामुळे पूर्वीसारखी पूरस्थिती आता उद्भवत नाही" असं मोहोळ म्हणाले.

"ज्यांच्या सत्ताकाळात पुण्याच्या शहर नियोजनाचे बारा वाजले, बांधलेले उड्डाणपूल पाडावे लागले, इतकंच नाही तर कचऱ्याची कोंडी, खिळखिळी पीएमपीएमएल अशी लांबणारी यादी आहे आणि त्याच राष्ट्रवादीने भाजपवर तोंडसुख घेणे म्हणजे जरा अतिच झालं" अशा शब्दांत मोहोळ यांनी राष्ट्रवादीला धारेवर धरले आहे.