Pune Rains : मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नऊ दिवसांत ७०.८ मिलिमीटर पाऊस
शहरात १ ते ९ ऑक्‍टोबर या दरम्यान ७०.८ मिलिमीटर पाऊस पडला. ऑक्‍टोबरच्या पहिल्या नऊ दिवसांत शहरात सरासरी ३८.४ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा या सरासरीपेक्षा ३२.४ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुणे - वादळी वारे, गारपिटीसह मुसळधार पावसाने बुधवारी संध्याकाळी पुण्याला अक्षरशः झोडपले. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह सिंहगड रस्ता, सातारा रस्त्यावरील पद्मावती, धनकवडी, कात्रज येथे; तसेच पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कर्वेनगर, वारजे अशा उपनगरांत अर्धा-पाऊण तास धुवाधार पाऊस कोसळला.

पंधरा दिवसांपूर्वी सातारा रस्त्यावर झालेल्या हाहाकाराच्या आठवणीने पुणेकरांच्या अंगावर काटा आला. हस्त नक्षत्र सुरू झाल्यापासून काही दिवसांचा अपवाद वगळता शहरात रोज पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकाळी अंशतः ढगाळ वातावरण, दुपारी ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका, संध्याकाळी आकाश काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले जाते, वादळी वाऱ्यासह पावसाच्या मुसळधार सरी पडतात आणि त्यानंतर हवेतील गारठा वाढतो, असे वातावरण अनुभवाला येत आहे. बुधवारचा दिवसही याच क्रमाने उजाडला आणि त्याच क्रमाने मावळत होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली. मध्य वस्त्यांतील पेठांत गाराही पडल्या. वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची तारंबळ उडाली. पाऊस, गारा यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पादचारी आणि दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला मिळेल त्या ठिकाणी दाटीवाटीत थांबल्याचे दिसत होते. 

शहरात रात्री साडेआठ वाजेपर्यंत २०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर खडकवासला येथे एका तासात तब्बल ६२ मिलिमीटर पाऊस कोसळला.

बुधवारी पहाटेही तडाखा
बुधवारी पहाटे चारला लोहगाव, सिंहगड रस्ता, पाषाण या भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. सकाळी सहापर्यंत या सरी पडत होत्या. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत लोहगाव येथे ६६.२ मिलिमीटर, तर पाषाणला ५०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याच वेळी शहराच्या मध्य वस्तीतील शिवाजीनगर वेधशाळेत १०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains water heavy rain pune