
राज्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे आघाडीवर आहेत.
मुलांच्या लसीकरणात पुणे आठव्या स्थानावर
पुणे - राज्यात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या (Children) कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरणात (Vaccination) सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्हे आघाडीवर आहेत. पुणे जिल्हे (Pune District) आठव्या स्थानावर असून, गडचिरोली, वर्धा, गोंदीया, नंदूरबार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अद्यापही लसीकरणाला सुरुवात झाली नसल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व उद्रेकाच्या तिसऱ्या लाटेत ठळकपणे पुढे आले. लसीकरणामुळे कोरोनाच्या संसर्गाचा दर जास्त असूनही रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा कोणत्या ना कोणत्या सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. बहुतांश रुग्ण घरात उपचार घेऊन बरे झाले. त्यात लसीकरणाचे महत्त्व खूप आहे. या पार्श्वभूमिवर १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाला केंद्राने आता परवानगी दिली आहे. त्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये राज्यात ४२ हजार ८७४ मुला-मुलींनी लस घेतली. त्यात सर्वाधिक लस ही सातारा जिल्ह्यामधील मुलांनी घेतल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
सातारा जिल्ह्यात सुमारे ९७ हजार ७०१ मुले १२ ते १४ वयोगटातील आहेत. त्यापैकी लसीकरणाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये १० हजार २४५ मुलांनी लस घेतली. राज्यात या वयोगटातील लसीकरणात सातारा पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूरमध्ये पाच हजार २२८ आणि सांगलीमध्ये चार हजार ८८६ मुलांनी लस घेतल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
पुणे जिल्हा मुलांमधील लसीकरणात आठव्या क्रमांकावर आहे. राज्यातील एकूण लसीकरणात आघाडीवर असलेला हा जिल्हा मुलांच्या लसीकरणातील पहिल्या दोन दिवसांमध्ये काही अंशी मागे असल्याचे दिसते. १४ वयोगटातील ३९ लाख १९ हजार मुलांपर्यंत लशीचे डोस पोचवायचे आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील नऊ टक्के (तीन लाख ५७ हजार ५७१) मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
मराठवाड्याची आघाडी...
बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण लसीकरणाच्या २४ टक्के मुलींनी लस घेतली. त्यात बीड (चार हजार ६१९) राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद (तीन हजार ७८) आणि लातूर (दोन हजार ४५३) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
विदर्भासह कोकणाची पिछाडी...
मुलांच्या वयोगटातील लसीकरणात सहा जिल्ह्यांमध्ये एकाही मुलाला लस मिळाली नाही. त्यात गडचिरोली, गोंदीया, वर्धा, नंदूरबार, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे.
एकावेळी जमेनात किमान १५ मुले
पुणे - ‘एकावेळी कोरोनाप्रतिबंध लसीकरण केंद्रावर किमान १५ ते १८ मुले मिळत नाहीत. अर्धा-पाऊण तास वाट बघूनही संख्या पूर्ण होत नाही. त्यामुळे लस न घेताच केंद्रावरून परत फिरावे लागते,’ अशी खंत मुलांचे पालक संतोष जोशी यांनी व्यक्त केली.
शहरात गेल्या तीन दिवसांपासून १२ त १४ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. कॉर्बोव्हॅक्स ही लशीचा डोस या अंतर्गत मुलांना देण्यात येत आहे. या लशीची वायल २० डोसची आहे. त्यामुळे ही वायल फोडल्यानंतर २० मुले असावी, अशी अपेक्षा आहे. किमान १५ ते १८ मुले एकावेळी लस घेण्याच्या रांगेत असली पाहिजे. त्यातून लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न असतो, अशी माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आली.
याबाबत १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलाचे पालक जोशी म्हणाले, ‘‘केंद्रांवर अद्यापही मुले येत नाहीत. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या मुलांना वाट बघावी लागते. शेवटी नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदवून १२ ते १५ मुले आले की फोन करा, त्या वेळी मुलांना घेऊन येतो, असे सांगून घरी परत आलो.’’ मुलांच्या परीक्षेचे दिवस आता जवळ आले आहेत. या वर्षी शाळा ऑनलाइन झाली आणि आता परीक्षा ऑफलाइन होणार आहे. त्यामुळे परीक्षेनंतर सुटी लागली की, लस घेण्याचा विचार असल्याचे पालक रूपाली कदम यांनी सांगितले.
महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘शहरात १२ ते १४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात मिळणारा प्रतिसाद वाढत आहे.’
Web Title: Pune Ranks Eighth In Immunization Of Children
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..