esakal | पुणेकरांना मिळकतकराचा लाभ घेण्यासाठी उरला अवघ्या सात दिवसांचा कालावधी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal

पुणेकरांना मिळकतकराचा लाभ घेण्यासाठी उरला अवघ्या सात दिवसांचा कालावधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मिळकत करदात्यांना (Property Tax) पंधरा टक्क्यांच्या सवलतीचा (Concession) लाभ घेण्यासाठी आता अवघ्या सात दिवसांचा कालावधी राहिला आहे. मुदतीत कर भरला तरच ही सवलत मिळणार आहे. दरम्यान गेल्या ५३ दिवसांत ३ लाख ६७ हजार ३१५ मिळकतदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. (Pune Residents have Only Seven Days Left to Avail Property Tax Benefits)

चालू आर्थिक वर्षात एक एप्रिल ते २३ मे दरम्यान महापालिकेला मिळकत कराच्या रूपाने ४५७.७९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मिळालेला एकूण महसूल पाहता, गतवर्षीच्या तुलनेत तो दुप्पट असल्याचे समोर आले आहे. तर मुदतीत कर भरलेल्यांना आतापर्यंत महापालिकेकडून ३५.७५ कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे.

हेही वाचा: करोनाग्रस्त मुलांसाठी आनंददायी वातावरणातील रूग्णालय;पाहा व्हिडिओ

मागीलवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. अशा परिस्थितीतही पुणेकरांनी महापालिकेला साथ दिली. एक एप्रिल ते ३० स्पटेंबर या कालवधीत ४ लाख ७७ हजार ८४२ मिळकतदारांनी ४३४.१९ कोटी रुपयांचा कर भरला होता. त्यांची दखल घेऊन महापालिकेने चालू वर्षी ३१ मेपर्यंत मुदतीत कर भरणाऱ्या मिळकतदारांना शासनाचे कर वगळून उर्वरित रकमेवर १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यालाही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद देत महापालिकेच्या तिजोरीत ४५७ कोटी रुपयांचा कर भरला आहे. मागीलवर्षी याच कालवधीत १ लाख ८८ हजार १०६ मिळकतदारांनी २०२.९३ कोटी रुपयांचा कर भरला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुदतीत कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक झाली असल्याचे समोर आले आहे.

मुदतीत कर भरला, तरच फायदा

मागीलवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत मिळकत भरलेल्या मिळकतदारांनाच या सवलतीचा फायदा मिळणार आहे. सवलतीची अंतिम मुदत सात दिवसांवर आली आहे. त्यामुळे सवलतीस पात्र असलेल्या, परंतु अद्यापही मिळकत न भरलेल्या मिळकतदारांची संख्या जवळपास १ लाख १० हजार ५२७ आहे. या मिळकतदारांनी मुदतीत कर भरला, तर त्यांना फायदा मिळणार आहे.

मागीलवर्षी मुदतीत मिळकत कर भरलेल्या मिळकतदारांसाठी महापालिकेने सवलत योजना जाहीर केली आहे. एकतीस मेपर्यंत कर भरल्यानंतर त्यांना शासनाचे कर वगळून इतर सर्व करांवर १५ टक्क्यांची सवलत मिळणार आहे. त्यासाठी सात दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे अधिकाधिक मिळकतदारांनी कराचा भरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा.

- विलास कानडे (कर आकारणी व कर संकलनप्रमुख, पुणे महापालिका)

loading image