esakal | वीकेंड लॉकडाउनला पुणेकरांनी दिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Weekend Lockdown

वीकेंड लॉकडाउनला पुणेकरांनी दिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी लागू केलेल्या वीकेंड लॉकडाउनला शनिवारी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दूध खरेदी, अत्यावश्‍यक सेवेच्या ठिकाणी जाणारे कर्मचारी यांसह इतर आवश्‍यक बाबींसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची सकाळी काही ठिकाणी तुरळक गर्दी झाली होती. मात्र, शनिवारी दुपारी शहरासह उपनगरांत शुकशुकाट पसरला होता.

नागरिकांनी वीकेंड लॉकडाउन आणि कोरोनाविषयक खबरदारी नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी शहरातील महत्त्वाच्या चौकांसह तब्बल ९६ ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. मात्र, फार कमी चेक नाक्यांवर नागरिकांची तपासणी केली जात असल्याचे पाहायला मिळाले. मेडिकल व अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व दुकाने शनिवार आणि रविवारी बंद ठेवली आहेत. त्यामुळे घरगुती वापरासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तूंची अनेकांनी शुक्रवारीच खरेदी केली होती.

हेही वाचा: दुसऱ्यांना हसविणाऱ्या ‘जोकर’च्या डोळ्यात पाणी

याबाबत मेडिकल व्यावसायिक संतोष माने-देशमुख म्हणाले, ‘‘आठवड्याचा विचार करता शनिवारी सदाशिव पेठेतील होलसेल मेडिकल मार्केटमध्ये जास्त गर्दी आहे. मात्र, परिसरात इतरत्र शुकशुकाट आहे. या ठिकाणी औषधे खरेदी करण्यासाठी येणारे ८० टक्के रिटेलर आहेत, तर उर्वरित डॉक्टर, हॉस्पिटल चालक असतात. कोरोनाविषयक औषधे आणि वस्तूंचीच मागणी सध्या जास्त आहे.’’

शहरात ९६ ठिकाणी चेकपोस्ट सुरू केले आहेत. सवलती व्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वीकेंड लॉकडाउनमध्ये सवलत नसलेल्या आस्थापना आज बंद आहेत. मात्र, गेल्या दोन लॉकडाउनचा विचार करता, शनिवारी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त दिसून आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करणे, त्यांच्यावर खटला दाखल करणे किंवा दंड करणे, अशी कारवाई केली जात आहे.

- डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलिस आयुक्त