esakal | पुणे : रिंगरोडच्या कामाला मिळणार गती

बोलून बातमी शोधा

Ring Road

पुणे : रिंगरोडच्या कामाला मिळणार गती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पश्‍चिम भागात ११४ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पश्‍चिम भागातील रिगरोडच्या भूसंपादनासाठी मार्गिकेच्या मोजणीचे काम गतीने सुरू झाले आहे. अवघ्या पंधरा दिवसांत आठ गावांतील सुमारे ११४ हेक्टर जमिनीचे मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. भूसंपादनासाठी रिंगरोडच्या मार्गिकिच्या मोजणीचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार पंधरा दिवसांपासून मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. एमएसआरडीसी, कृषी खाते, वन खाते, भूमी अभिलेख आणि सार्वाजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी एकत्रितपणे या मोजणीचे काम करीत आहेत. पश्‍चिम भागातील रिंगरोडसाठी सुमारे ७५० हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. भूसंपादनाआधी जमिनींची मोजणी करणे आवश्‍यक आहे. गेल्या पंधरा दिवसांत घोटवडे, मातेरेवाडी, अंबडवेट, भरे, कासार आंबोली आणि एका गावातून जाणाऱ्या रिंगरोडच्या मार्गिकेची मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ११४ हेक्टर जमिनीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्‍चिम भागातील रिंगरोड ज्या चार तालुक्यात जाणार आहे, त्यामध्ये सर्वाधिक मुळशी आणि हवेली तालुक्यातून तो जाणार आहे. मोजणीच्या सुरुवातील या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र, भूसंपादन अधिकारी संदेश शिर्के आणि सचिन बारावकर यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पाची सर्व माहिती दिल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. त्यामुळे मोजणीचे काम सुरू झाले आहे.

हेही वाचा: देहविक्री करणाऱ्या महिलांना पुणे जिल्हा प्रशासनाकडून 8 कोटींचे अर्थसहाय्य

असा असेल मार्ग

  • पूर्व रिंगरोड : उर्से (ता. मावळ) ते खेड, हवेली, पुरंदर तालुक्यातून केळवडे (ता. भोर)

  • पश्‍चिम रिंगरोड : केळवडे (ता. भोर) ते हवेली, मुळशी तालुक्यातून उर्से टोल नाका येथे एकत्र

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • पश्‍चिम भागातील चार तालुक्यांतून जाणार

  • ७५० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन

  • मोजणीच्या कामाला सुरुवात

  • पंधरा दिवसांत ११४ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण

  • स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मोजणीच्या कामाला आज सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे पंधरा दिवसांत आठ गावांतील सुमारे ११४ हेक्टर जमिनीचे मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

- संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी, एमएसआरडीसी