Pune रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकाचा पालिकेविरोधात घोषणाबाजी ; सिहंगड रस्त्यावर मांडला ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकाचा पालिकेविरोधात घोषणाबाजी ; सिहंगड रस्त्यावर मांडला ठिय्या

किरकटवाडी : अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि अत्यंत दुरवस्था झालेल्या खडकवासला व किरकटवाडी या दोन गावांच्या शीव रस्त्यासाठी नागरिकांनी आक्रमक होत मुख्य सिंहगड रस्त्यावर तब्बल दिड ते दोन तास ठिय्या मांडला होता.

खराब रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असताना पालिका व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी हा विषय गांभीर्याने घेत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. महत्वाचे म्हणजे आंदोलन स्थळी निवेदन स्विकारण्यासाठी पोलीसांना पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घ्यावे लागले. खडकवासला गावच्या कोल्हेवाडी व किरकटवाडी गावच्या शिवनगर या भागासाठी शीव रस्ता हा एकमेव पर्याय आहे.

दहा ते पंधरा हजार लोकसंख्या या रस्त्यावर अवलंबून असताना अनेक वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे काम रखडलेले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे 87 लाख रुपये निधी मंजूर असताना अधिकारी काम सुरू करण्यास वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत आहेत.

अखेर संतापलेल्या खडकवासला व किरकटवाडीच्या नागरिकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक , मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून आज मुख्य सिंहगड रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करत ठिय्या मांडला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

महत्वाचे म्हणजे लहान मुले, महिला, वृद्ध, तरुण यांसह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आंदोलनासाठी उपस्थित होते. शीव रस्ता कृती समितीच्या माध्यमातून या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ नागरिक रस्त्यावर बसल्यानंतर मुख्य सिंहगड रस्त्यावर दोन्ही बाजूंना मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आंदोलक संतप्त झाले होते. जबाबदार अधिकारी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी पालिका व मुख्यमंत्री ग्राम योजनेच्या अधिकाऱ्यांना फोन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ येत असल्याने पोलीसही हतबल झालेले दिसत होते.

"नागरिकांनी आठ दिवसांपूर्वी आंदोलनाचे निवेदन दिले तेव्हाच आम्ही संबंधित विभागांशी याबाबत पत्रव्यवहार केला होता. तसेच वारंवार फोन करून योग्य कार्यवाही करण्याबाबत कळवले होते. असे असताना अधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी आंदोलनस्थळी हजर नव्हते.

अक्षरशः फोन करुन अधिकाऱ्यांना बोलावून घ्यावे लागले. याबाबत सविस्तर अहवाल आम्ही सादर करणार आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य रस्त्यावरुन बाजूला होण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.