तरुणाने प्रतिकार केल्यामुळे चोरटे दुचाकी सोडून फरार

तरुणाने प्रतिकार केल्यामुळे
चोरटे दुचाकी सोडून फरार
Published on

पुणे, ता. ११ : कोथरूड परिसरात रविवारी मध्यरात्री एका तरुणाला मारहाण करत तीन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, चोरी करून पळ काढताना तरुणाने प्रतिकार केल्यामुळे चोरटे दुचाकी घटनास्थळीच सोडून फरार झाले.
याप्रकरणी भारतीनगरमधील ३४ वर्षीय तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण रविवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी पौड रस्ता परिसरात गेला होता. कोथरूड कचरा डेपोलगत पुष्कर इमारतीजवळ पोहोचला असता, दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याला अडवले. काही समजण्यापूर्वीच चोरट्यांनी त्याला मारहाण करून गळ्यातील तीन तोळ्यांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, फिर्यादी तरुणाने प्रसंगावधान राखत धैर्याने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तरुणाचा आक्रमक पवित्रा पाहून चोरटे घाबरले. धावपळीत चोरट्यांनी त्यांची दुचाकी तिथेच टाकून पळ काढला.
कोथरूड पोलिसांनी घटनास्थळावरून चोरट्यांची दुचाकी ताब्यात घेतली आहे. या दुचाकीच्या क्रमांकावरून आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिस आरोपींचा माग काढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com