
कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सध्या सुरू असलेल्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी आश्चर्यकारक पण सुखद चित्र पाहायला मिळाले.
Drama Competition : पुणे : संस्कृत नाट्य स्पर्धा 'हाऊसफुल्ल'
पुणे - कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सध्या सुरू असलेल्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी आश्चर्यकारक पण सुखद चित्र पाहायला मिळाले. नाटकांचे सादरीकरण पाहण्यासाठी जवळपास ७०० रसिकांनी हजेरी लावली होती. संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेच्या इतिहासात प्रेक्षकांच्या उपस्थितीचा हा विक्रमी आकडा ठरला.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेत यंदा सहभागींची संख्याही तुलनेने वाढली होती. पुणे केंद्रावरून तेरा संघ या स्पर्धेत सादरीकरण करत आहेत. स्पर्धकांच्या या उत्साहाला दाद देण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांना प्रोत्साहन दिले. यंदाच्या स्पर्धेत महाविद्यालयांचा लक्षणीय सहभाग आहे. प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळवण्यात तेही एक महत्त्वाचे कारण ठरले.
विशेष म्हणजे, याच वर्षी स्पर्धेचे स्थळ बदलण्यात आले होते. यापूर्वी गेली अनेक वर्षे सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर या खाजगी नाट्यगृहात स्पर्धा भरवली जात होती. मात्र यंदा त्यांनी वीजबिलात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारची स्पर्धा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, या महापालिकेच्या नाट्यगृहात स्थलांतरित करण्यात आली. स्थळ बदलल्यावर त्याच वर्षी विक्रमी प्रेक्षक संख्येची नोंद झाली आहे.
शनिवारी अखेरचा दिवस
संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून (ता. ९) सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता. १०) नाट्यगृह उपलब्ध नसल्याने एकही सादरीकरण होणार नाही. मात्र, शनिवारी (ता. ११) स्पर्धेचा समारोप होणार असून सायंकाळी ५ ते १० या वेळेत तीन नाटकांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश असून अधिकाधिक प्रेक्षकांनी स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेला पहिल्यांदाच एवढी गर्दी झाली आहे. यावर्षी अनेक महाविद्यालये स्पर्धेत सहभागी झाली आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. महाविद्यालयांच्या सहभागाने स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतील आणि वेगाने प्रसार होण्यास मदत होईल.
- राहुल लामखडे, स्पर्धा समन्वयक