
ज्येष्ठ गायिका कमला भोंडे, प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या हेमलता बिडकर यांच्यासह सहा महिलांना ‘सावित्रीबाई फुले सन्मान २०२३’ जाहीर करण्यात आला.
Savitribai Phule Sanman 2023 : गायिका कमला भोंडे, अश्विनी भिडे यांच्यासह ६ महिलांना ‘सावित्रीबाई फुले सन्मान २०२३’ जाहीर
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने यंदा ज्येष्ठ गायिका कमला भोंडे, प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या हेमलता बिडकर यांच्यासह सहा महिलांना ‘सावित्रीबाई फुले सन्मान २०२३’ जाहीर करण्यात आला आहे.
विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना दरवर्षी ‘सावित्रीबाई फुले सन्मान’ देऊन गौरविण्यात येते. यावर्षी गौरविण्यात येणाऱ्या महिलांची नावे विद्यार्थी विकास मंडळाने जाहीर केली आहेत. त्यात संगीत साधनेत आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ गायिका कमल भोंडे (अमरावती), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, नाशिक येथील आदिवासी भागात वंचित आणि वनवासींच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या हेमलता बिडकर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उपमहाव्यवस्थापक प्रतिक्षा तोंडवळकर (मुंबई), उद्योजिका जाई देशपांडे (सातारा), नृत्य कलाकार डॉ. सान्वी जेठवानी (नांदेड) या महिलांना ‘सावित्रीबाई फुले सन्मान’ जाहीर झाल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाकडून देण्यात आली आहे.
या सन्मानाचे हे चौथे वर्ष असून यावर्षी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शोध समितीने या नावांची निश्चिती केली आहे. येत्या काही दिवसांतच या सन्मान सोहळ्याचे नियोजन करण्यात येईल, असे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी सांगितले.