
आश्वासक सरोदवादन आणि दिग्गज व तरुण कलाकारांच्या गायनाने ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिक मंत्रमुग्ध झाले.
Sawai Gandharv Bhimsen Mahotsav : दिग्गजांसह तरुणांनी गाजविला दुसरा दिवस
पुणे - आश्वासक सरोदवादन आणि दिग्गज व तरुण कलाकारांच्या गायनाने ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिक मंत्रमुग्ध झाले. व्हायोलिनचे स्वर्गीय सूर आणि त्यावर सादर झालेल्या पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरांनी अजरामर झालेल्या रचना, हे या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. ज्येष्ठ व्हायोलिनवादक विदुषी डॉ. एन. राजम यांनी त्यांच्या कन्या व नातींसह सादर केलेल्या अद्भुत कलाविष्काराला रसिकांनी भरभरून दाद दिली.
किराणा घराण्याचे युवा गायक अविनाश कुमार यांनी आपल्या आश्वासक गायकीने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात केली. राग पुरिया धनश्री प्रस्तुत करताना त्यांनी द्रुत तीनतालातील ‘पायलिया झंकार मोरी’ आणि एकतालातील बंदिश सादर केली. संत कबीर रचित ‘मन मन फूला फूला फिरे जगत में’ या भजनाने त्यांनी सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे, तबल्यावर पांडुरंग पवार आणि तानपुऱ्यावर आदर्श शर्मा व प्रणव कुमार यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात प्रख्यात सरोदवादक अली अकबर खाँ यांचे सुपुत्र सरोदवादक आलम खाँ यांची मैफल रंगली. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी समर्पक साथसंगत केली.
मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने तिसऱ्या सत्राला सुरवात करण्यासाठी पं. साजन मिश्रा व पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा मंचावर आले. यावेळी सर्वांनाच पं. राजन मिश्रा यांची उणीव जाणवली. पं. भीमसेन जोशी आमच्यासाठी गुरुतुल्य होते, त्यांचा आशीर्वाद आमच्यासह कायम आहे, असे सांगत पं. साजन मिश्रा यांनी गायनाला प्रारंभ केला.
तीन पिढ्यांचा अद्भुत स्वराविष्कार
समारोपाच्या सत्रात संगीताचा समृद्ध वारसा लाभलेल्या घराण्यातील ज्येष्ठ व्हायोलिनवादक विदुषी डॉ. एन. राजम यांच्या कन्या संगीता शंकर आणि नाती रागिणी व नंदिनी शंकर यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वरमंचावर आगमन झाले. व्हायोलिनच्या विस्मयचकित करणाऱ्या वादनाने त्यांनी उपस्थितांना नादब्रह्माची अनुभूती दिली. स्वरमंचावर चार व्हायोलिन वाजत असूनही जणू काही एकच व्हायोलिन वाजत आहे, असा अनुभव श्रोत्यांना आला. त्यांनी ‘माझे माहेर पंढरी...’ हा पं. भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेल्या अभंग सादर केला. तर, ‘जो भजे हरी को सदा’ या भजनाने व वादनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर मुकेश जाधव आणि तानपुऱ्यावर वैदेही अवधानी व दिगंबर जाधव यांनी साथ केली.
पीएमपीची बससेवा
सवाई गंधर्व महोत्सवाला येणाऱ्या प्रवाशांना रात्री शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत पोचता यावे, यासाठी पीएमपीने विशेष बससेवा सुरू केली आहे. कार्यक्रमस्थळापासून ४ मार्गांवर बससेवा उपलब्ध असेल. कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी २५ टक्के जादा दराने बस उपलब्ध करून दिल्या आहेत. १८ डिसेंबरपर्यंत या बस उपलब्ध असतील, असे पीएमपी प्रशासनाने नमूद केले आहे.
क्षणचित्रे
पहिल्या सत्रात युवा गायक अविनाश कुमार यांना भजनाला साथ देण्यासाठी ९६ वर्षीय माऊली टाकळकर स्वरमंचावर आले. त्यांच्या उत्साहाला आणि संगीतनिष्ठेला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
प्रख्यात सरोदवादक अली अकबर खाँ आणि पं. भीमसेन जोशी यांची घनिष्ट मैत्री होती. चारचाकी चालवण्याची आवड, हा त्या दोघांमधील समान दुवा होता, अशी आठवण भीमसेनजी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी अली अकबर खाँ यांचे सुपुत्र आलम खाँ मंचावर आल्यावर सांगितली. पुढील पिढीतही हा मैत्रीचा वारसा पुढे चालवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तिसऱ्या सत्रात सादरीकरण करणाऱ्या कलाकारांपैकी एका कलाकाराला ट्रॅफिकचा फटका बसला. त्यातून वाट काढत यायला उशीर झाल्यामुळे या सत्राला काहीशा विलंबाने सुरुवात झाली.
पं. साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा यांचे सादरीकरण सुरू असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वरमंडपात आगमन झाले. पाटील यांनी सुमारे अर्धा तास मैफिलीचा आस्वाद घेतला.
७५ प्रकाशचित्रांमधून पं. भीमसेनजींना आदरांजली
प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी कॅमेऱ्यातून टिपलेल्या भावमुद्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भीमसेनजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने ‘शताब्दीस्मरण’ या शीर्षकाने ७५ प्रकाशचित्रे येथे रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात पाकणीकर यांच्याबरोबरच दिवंगत प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी यांनी टिपलेल्या मुद्रांमधून या महोत्सवाची ऐतिहासिक सफर घडते.
पं. राजन मिश्रा यांच्या आठवणींना उजाळा
पं. राजन-साजन मिश्रा या प्रख्यात जोडगळीतील पं. राजन मिश्रा यांचे कोरोना काळात गतवर्षी निधन झाले. त्यामुळे यंदा पं. साजन मिश्रा पहिल्यांदाच पं. राजन मिश्रा यांच्याविना ‘सवाई’च्या मंचावर सादरीकरणासाठी आले. ज्येष्ठ बंधू पं. राजन मिश्रा यांच्यासह १९७५ पासून ‘सवाई’मध्ये मी सादरीकरण करतो आहे. त्यांचे निधन हा माझ्यासाठी फार मोठा धक्का होता. यंदा ते नसले, तरी त्यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा माझ्यासह सादरीकरण करत आहेत. आमच्यावर जसे प्रेम केले, तसेच आमच्या पुढील पिढीवरही करत राहा,’ असे आवाहन पं. साजन मिश्रा यांनी रसिकांना केले.
आज महोत्सवात
दुपारी ४ ते रात्री १०
मनाली बोस : गायन
राहुल शर्मा : संतूरवादन
श्रीनिवास जोशी : गायन
पं. अजय चक्रवर्ती : गायन
सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरण करण्याचा आनंद शब्दातीत आहे. महोत्सवाच्या बहुधा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षीच मी वडिलांसह सादरीकरणासाठी आले होते. पं. भीमसेन जोशी यांनी ज्या अगत्याने आमचे स्वागत केले होते, ते आजही लक्षात आहे. प्रारंभी एका लहानशा सभागृहात सुरू झालेला हा महोत्सव आज इतक्या भव्य स्वरूपात पार पडताना पाहून अतिशय आनंद होत आहे. या महोत्सवासारखे जाणकार रसिक अन्यत्र पाहायला मिळणे, दुर्मीळ आहे.
- डॉ. एन. राजम, प्रख्यात व्हायोलिनवादक