
Pune : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बारामतीत आणण्यासाठी पवारांकडे आग्रह
Pune - कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा धनगर समाज बांधवांचा प्रयत्न आहे. काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत निमंत्रीत करण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रथमदर्शनी चर्चा झाली.
तसेच संबंधित नेत्यांना तसा पत्रव्यवहारही झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नेते विश्वास देवकाते यांनी पत्रकारांशी बोलताना आज स्पष्ट केली. या राजकिय प्राप्त स्थितीचा विचार करता कर्नाटकमध्ये झालेल्या परिर्वतनाची घौडदौड महाराष्ट्रात बारामतीपासून होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत आणण्याचा प्रय़त्न आहे का, अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.
पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यासाठी चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस गेले होते. तसेच तेथे त्यांनी भाजपमय वातावरण निर्माण करण्याचा चांगला प्रय़त्न केला होता. त्या तुलनेत बारामतीमध्येही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जंगी साजरी होण्यासाठी येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विश्वास देवकाते आदींनी थेट शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून भाजपला चारीमुंड्या चित करून कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेले धनगर समाजाचे व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमिवर धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्यासमवेत प्रथमदर्शनी याआगोदर एक बैठक पार पडली आहे, तसेच रविवार (ता. ४) रोजी बारामतीमध्येही अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान सभागृहात धनगर समाज बांधवांची बैठक झाली. त्या संबंधी विश्वास देवकाते यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले,``महाराष्ट्रात धनगर समाज मोठा आहे. त्यांना न्याय देण्याचे खऱ्याअर्थाने काम कोणी केले असेल तर ते काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाने. परंतु भाजपच्या नेतेमंडळींनी धनगर समाज आमच्या बरोबर आहे, असे जे काही चित्र निर्माण करण्याचा प्रय़त्न केले तो चूकीचे आहे. नगर जिल्ह्यासह बारामतीच्या मेडीकल काॅलेजला अहिल्यादेवी होळकराचे नाव शिंदे-फडणविस सरकारने दिले, त्यांचे आम्ही स्वागत करतो.
परंतु शासनस्तरावर कोठ्यावधी रुपये मंजूर करून जे अद्ययावत बारामती मेडीकल काॅलेज उभारले गेले आहे, ते केवळ विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या अथक प्ररिश्रमामुळे हे वास्तव चित्र बारामतीकरच नव्हे तर राज्यातील जनता कदापी विसरणार नाही. अजितदादा ऐवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मराठा समाज, धनगर समाजाबरोबर अनेक जातीधर्मातील संघटनांच्या इमारतींसाठी पुरेशी जागा, इमारती बांधणे आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
`` कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बारामतीत आणण्यामागे काय उद्देश आहे, असे विचारले असता देवकाते म्हणाले,`` कर्नाटक राज्यापासून आता परिर्वतनाची लाट सुरू झाली आहे. भाजपवाले खोटीनाटी आश्वासने देवून, तसेच विविध प्रकारचे भितीदायक वातावरण तयार करून सत्ता बळकाविण्याचा प्रकार करीत आहेत.
हे आता लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये झालेल्या परिर्वतनाची घौडदौड महाराष्ट्रात बारामतीपासून होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.`` दुसरीकडे, बारामतीमध्ये ३१ वर्षांपासून अहिल्यादेवी होळकर यांची मोठी जयंती साजरी होते. या कार्य़क्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यसरकारमधील आजीमाजी मंत्री व पदाधिकाऱ्यांनी हाजेरी लावल्याची नोंद असल्याचे सांगण्यात आले.