Shirur Loksabha : शिरूरमधून लोकसभेसाठी उमेदवार ठरला; शरद पवारांनी जाहीर केले नाव pune shirur loksabha constituency candidate declare by sharad pawar politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar amol kolhe.

Shirur Loksabha : शिरूरमधून लोकसभेसाठी उमेदवार ठरला; शरद पवारांनी जाहीर केले नाव

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच सोमवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता कोल्हे यांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी सुमारे वर्षभराचा वेळ मिळणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात शिरूरसह जालना आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची बैठक निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे आदी या बैठकीला उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक होत असताना त्यामध्ये माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. मतदारसंघातील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मत व्यक्त करताना अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात भूमिका मांडली.

सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आपण निवडणूक लढण्यास तयार आहात का, असे शेवटचे विचारत आहे, असा प्रश्न केला. त्यावर अमोल कोल्हे यांनी पक्ष सांगेल ती भूमिका मान्य असेल असे उत्तर दिले. त्यावर देखील अजित पवारांनी तुमचं मत काय आहे, हे स्पष्टपणे सांगा, असे सांगितल्यावर कोल्हे यांनी मी निवडणूक लढविण्यास तयार आहे असे स्पष्ट केले. शरद पवार यांनी देखील होकार दर्शवत कोल्हे यांच्या उमेदवारीला होकार दर्शविला.

'२०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून पवार साहेबांनी ग्रीन सिग्नल देत मला शुभाशीर्वाद दिलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत देखील शिरूर मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मला चांगले सहकार्य केले. विलास लांडे यांची भूमिका महत्त्वाची असून भोसरी मतदारसंघातून २०१९ ला भाजपचे मताधिक्य कमी करण्यात यश आलेले आहे. २०२४ मध्ये यापेक्षा तिथून चांगले मतदान मिळेल, त्यामुळे विलास लांडे यांचे सहकार्य महत्त्वाचे असेल.

मी कला क्षेत्रात कार्यरत असल्याने थोडासा जनसंपर्क कमी झालेला होता यापूर्वी ज्या प्रकल्पांसाठी मी शब्द दिला होता त्या पूर्ण करणे देखील माझ्यासाठी महत्त्वाचे होते पण गेल्या चार वर्षात बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक महामार्ग या दोन प्रमुख विषयांवर मी निवडणूक लढवली होती, हे दोन्ही विषय पूर्ण झालेले आहेत आगामी काळात देखील शिरूर मतदार संघात अनेक मोठ्या महामार्गांचे काम होणार आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना विलास लांडे म्हणाले, अमोल कोल्हे यांनी आता वर्षभरात त्यांचा जनसंपर्क वाढवावा आणि निवडणुकीला लोकांसमोर जावे. शरद पवार आणि अजित पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार अजून वर्ष बाकी आहे. त्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची याबाबत अजून कुठेही स्पष्ट झालेले नाही, मात्र पक्षाची जबाबदारी दिली ती मी पार पाडेन.