औरंगाबादनंतर आता पुण्याच्या नामांतराची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

पुणे शहराचे नामांतर करुन पुण्याला 'जिजापूर' असे नाव द्या, अशी मागणी केली आहे.

पुणे : औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबूर सुरू आहे. शिवसेनेने पहिल्यापासूनच या नामांतराला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शविला आहे. या साऱ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनेही नामांतरासंदर्भातच आपली जुनी मागणी पुढे रेटली आहे. त्यांनी पुणे शहराचे नामांतर करुन पुण्याला 'जिजापूर' असे नाव द्या, अशी मागणी केली आहे.  याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला वेळ लागत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराक झालेल्या पुणेला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे 'जिजापूर' असे नामांतर करून टाका. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे.

हेही वाचा - पुण्यात होणार चार जानेवारीला राज्यस्तरीय युवा संसद

पुढे त्यांनी म्हटलं की, शिवनेरी पासून लाल महाल पर्यंत आणि पुरंदर पासून तोरणा, राजगड, सिंहगड, विसापूर, लोहगड, राजमाची, विचित्रगड ते स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पर्यंत सह्याद्री ओरडून ओरडून कर्तुत्व आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आपला पुणे जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबा'ला घेऊन सोन्याचा नांगर चालून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे. घडलं ते रयतेच स्वराज्य.

नामांतराचे  राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका. मा. थोरात साहेब, टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आणि पचणार नाही, आमचा वारसा आम्हाला अजून गौरवपुर्वक चालवू द्या. म्हणून पुण्याला 'जिजापुर' हे नाव द्या, असं म्हणत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी ही मागणी केली आहे
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune should be named as jijapur Sambhaji Brigade