
सोशल मीडियावरून जुन्या मित्रांशी संपर्क होऊन पुन्हा मैत्रीचा धागा जोडला जात आहे, त्यांच्याप्रती आदराची भावना निर्माण होत आहे.
Pune News : हृदयविकाराने मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या मदतीला वर्गमित्र धावले
उंड्री - सोशल मीडियावरून जुन्या मित्रांशी संपर्क होऊन पुन्हा मैत्रीचा धागा जोडला जात आहे, त्यांच्याप्रती आदराची भावना निर्माण होत आहे. सोशल मीडियावरून १९९० मधील वर्गमित्राचे हृदयविकाराने एलआयसी एजंट मित्राचा मृत्यू झाल्याचे समजले आणि हृदय हेलावून गेले. त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख २९ हजार ६१३ रुपयांचा धनादेश दिला. शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावरील मित्र एकत्र येत आहेत. त्यातून मित्रासाठी काही पण म्हणत... समाजामध्ये चांगली भावना निर्माण होत आहे.
प्रेम नागोराव मोठे (वय ४८, रा. महादशी शिंदेची छत्री, वानवडी) असे हृदयविकाराने निधन झालेल्याचे मित्राचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
हांडेवाडी वाहतूक शाखेचे विजय आवटे म्हणाले की, पाचवी ते दहावीमध्ये आम्ही एकत्र शिक्षण घेत होतो. १९९०मध्ये दहावी झाल्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने पुढे गेले.
दरम्यान, कोणाचाही संपर्क झाला नाही. मागिल आठवड्यात सोशल मीडियावर प्रेम मोठे यांचे निधन झाल्याची माहिती समजली आणि हृदय हेलावून गेले. मित्राच्या कुटुंबीयावरील दुःखाचा भार हलका करण्यासाठी मित्रमंडळी एकत्र आलो आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा काही वाटा मित्रांनी उचलला, असे त्यांनी सांगितले.