
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना करण्यात आली आहे.
पुणे : मतदार यादीवरील हरकतीचा शोध घेताना कर्मचाऱ्यांची दमछाक
पुणे - प्रारूप मतदार यादीत भयंकर चुका असल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले होते. त्यावर हरकतींचा पाऊस पडल्यानंतर आता त्या हरकतीनुसार पत्ता शोधून पडताळणी करण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. पण सदोष मतदार यांद्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत आहे. आत्तापर्यंत २ हजार ८०० हरकतींची पडताळणी झाली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभागाची मतदारयादी निश्चीत करण्यासाठी प्रारूप मतदारयादी जाहीर केली. त्यावर राजकीय पक्ष, नागरिक, इच्छुक उमेदवारांनी सुमारे ४ हजार ७०० हरकती नोंदविलेल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून त्याचा अहवाल ९ जुलै पर्यंत सादर करा असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते, पण हरकतीचे प्रमाण जास्त असल्याने महापालिकेने मुदतवाढ मागितली होती, त्यानुसार आता १६ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.
प्रारूप यादीत मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत, बोगस मतदारांची संख्या मोठी आहे, या तक्रारी प्रामुख्याने होत्या. या प्रत्येक तक्रारीची जागेवर जाऊन पाहणी करावी लागते. यासाठी महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास २५ कर्मचारी नियुक्त केले असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ४ नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे.
गेल्या तीन चार दिवसांपासून शहरात पाऊस पडत असल्याचा परिणाम या पडताळणीवर झाला आहे. या कामासाठी नियुक्त केलेले काही कर्मचारी आजारी पडले आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना तातडीचे आदेश देत या कामासाठी हवे तेवढे कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक शाखेचे उपायुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘विधानसभेच्याच मतदार यादीत चुका असल्याने आता हरकतींची पडताळणी करताना अडथळे येत आहेत. विधानसभेचे मतदान केंद्र आणि आताच्या मतदान केंद्राची तुलना करून पडताळणीचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत २ हजार ८६२ हरकतींची पडताळणी झाली आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
Web Title: Pune Staff Exhausted Searching For Objections On Voter List
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..