Pune : तळेगाव ढमढेरे येथील रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणाबाबत तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : तळेगाव ढमढेरे येथील रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणाबाबत तक्रार

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर रस्त्याच्याकडेला अज्ञात व्यक्तींनी अवैध बांधलेले अतिक्रमनातील व्यावसायिक पत्राशेड याबाबत राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे लेखी तक्रार केली आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत आदी प्रशासनाला दिल्या आहेत. अतिक्रमणाबाबत संबंधित प्रशासनाने कारवाई करावी अशी माहिती राजेंद्र ढमढेरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, गावात रस्त्याच्याकडेला प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध ठिकाणी अवैधरित्या झालेले अतिक्रमण हटवावे अशी मागणी ग्रामपंचायततर्फे सरपंच अंकिता भुजबळ यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तळेगाव ढमढेरे गावातील रस्त्याच्या कडेला हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक, हायस्कूल शाळेसमोर, लक्ष्मी रोड चिमणापीर मळा, बाजार समिती, भैरवनाथनगर, तलाठी कार्यालयासमोर आदी ठिकाणी व्यवसायिकांनी अतिक्रमण करून रस्त्याच्या कडेला टपऱ्या टाकलेल्या आहेत. येथे व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण हटवावे अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली असून प्रशासनाच्या सूचना आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तसेच येत्या नऊ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित केली असून या सभेत जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ व ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, "गेल्या महिन्यात ग्रामपंचायततर्फे विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात असे सांगण्यात आले होते की, गाव टपरीमुक्त करण्यासाठी उपलब्ध शासकीय जागेत ग्रामपंचायततर्फे व्यापार संकुल उभे करावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करावा. व्यापार संकुलासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन आमदार अशोक पवार यांनी या कार्यक्रमात दिले होते.