

पुणे, ता. ५ : महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये एकवट मानधनावर काम करणारे शिक्षक, कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागातील आशा सेविकांचीही दिवाळी यंदा गोड होणार आहे. एकवट मानधनावर काम करणारे शिक्षक, कर्मचारी व आशा सेविकांना प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली.
महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध पदांवर कर्मचारी व शिक्षक एकवट मानधनावर काम करतात. शाळांमधील शैक्षणिक उपक्रम, प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी काम करणाऱ्या संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळत नाही. त्यामुळे संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बक्षीस देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्यास समितीने मान्यता दिली.
महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशा सेविकांनाही दिवाळी बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. माता व बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, विविध आजारांचे सर्वेक्षण आणि आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये आशा सेविका महत्त्वाची भूमिका बजावतात. अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांनाही आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी बक्षीस देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना दिवाळीनिमित्त आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.