

पुणे, ता. ८ : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी उपलब्ध झालेल्या ४३६ शिक्षकांपैकी ४१८ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. नियुक्तीपूर्वीची ही महत्त्वाची प्रक्रिया सहा समित्यांमार्फत राबविण्यात आली. या प्रक्रियेत १८ उमेदवार पडताळणीसाठी गैरहजर राहिले असून, प्रशासनाने त्यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेसाठी पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. यामध्ये उपशिक्षकांची २३४ पदे आहेत. पदवीधर शिक्षकांची २०२ पदे आहेत. त्यात भाषा आणि विज्ञान विषयांचा समावेश आहे. जिल्ह्यात उपशिक्षकांची ३६२ आणि पदवीधर शिक्षकांची २३१ पदे रिक्त आहेत. एकूण ५९३ रिक्त पदांपैकी ४३६ पदांसाठी शिक्षक उपलब्ध झाले आहेत. या शिक्षकांच्या नियुक्तीपूर्वी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. उमेदवारांनी सादर केलेली शैक्षणिक पात्रता, आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रांची समित्यांकडून छाननी करण्यात आली.
कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्ध रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त भार आहे. काही शाळांमध्ये विषयानुसार अध्यापन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे उपलब्ध झालेल्या शिक्षकांची नियुक्ती लवकर होणे अपेक्षित आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या ४३६ पैकी ४१८ शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणीचे काम समित्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या १८ शिक्षकांना ई-मेल करण्यात आले आहेत. त्यांचा अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
- ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.