Technology : संशोधनात भारी; आत्मनिर्भरतेत भरारी!

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जर स्वदेशी तंत्रज्ञान वापरात येत असेल तर त्याचा कधी ना कधी पुण्याशी संबंध आलेला असतोच.
Research
Researchsakal
Summary

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जर स्वदेशी तंत्रज्ञान वापरात येत असेल तर त्याचा कधी ना कधी पुण्याशी संबंध आलेला असतोच.

पुणे - देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जर स्वदेशी तंत्रज्ञान वापरात येत असेल तर त्याचा कधी ना कधी पुण्याशी संबंध आलेला असतोच. मग तो कोरोनाचा विषाणू असो, की आइन्स्टाईनच्या गुरुत्वीय लहरींचा शोध! भविष्यकालीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी हितगुज करण्याचे भाग्य या पुण्यनगरीला कायम लाभले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी संशोधन आणि विकासाची महत्त्वपूर्ण जबाबदारी येत्या काळात या ‘ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट’ला निभवावी लागणार आहे.

केवळ ज्ञाननिर्मितीचे शहर म्हणून नाही तर तंत्रज्ञानाचा विकास करणारे शहर म्हणून पुण्याची ओळख जगासमोर येत आहे. देशाला पहिला सुपरकंप्युटर देणारे हे शहर आता कोविड टेस्टिंग कीट, हायड्रोजन इंधनावर चालणारी पहिली कार एवढंच काय अॅक्टीव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडीयंटही देत आहे. आत्मनिर्भर भारताच्या रचनात्मक कार्यपद्धतीमुळे उद्योगांचा थेट संशोधनात सहभाग वाढला असून, मागील वर्षभरात झालेल्या विविध सहकार्य करारांतून याची व्याप्ती लक्षात येत आहे.

पुणे नॉलेज क्लस्टर

दोन डझनपेक्षा जास्त संशोधन संस्था पुणे शहरात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासात या संशोधन संस्था निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. सर्वसामान्य पुणेकर आणि शास्रज्ञांमध्ये दुवा बनण्यासाठी पुणे नॉलेज क्लस्टर स्थापना करण्यात आली आहे. उद्योगांच्या मदतीने आणि शास्रज्ञांच्या माध्यमातून पुणेकरांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न यातून होतो. म्हणूनच कोरोना काळात सिरो सर्वे, डिजिटल शिक्षण आणि शास्रीय आधारावर धोरणात्मक निर्णयासाठी क्लस्टरची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

महत्त्वपूर्ण संशोधन...

  • कृषी आणि वैद्यकीय रसायने

  • बॅटरी तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर पदार्थ आणि डिव्हायसेस

  • ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट

  • पदार्थ आणि जीव विज्ञान

  • कर्करोगासंबंधीचे पेशी विज्ञान

  • खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी

  • इ-वाहन आणि नवीनतम ऊर्जास्रोत

उद्योगांन्मुख संशोधनावर भर

आत्मनिर्भर भारतासाठी संशोधन संस्थांबरोबरच उद्योगांनीही कंबर कसली आहे. जैववैद्यकीय, रासायनिक, इलेक्ट्रॉनिक्स पदार्थ, सेमिकंडक्टर मटेरिअल, कृषी रासायनिक आणि ई-वाहन क्षेत्रातील संशोधनासाठी सामंजस्य करारांवर भर देण्यात आली आहे. नॅशनल सुपरकंप्युटर मिशन, नॅशनल क्वांटम मिशन आणि सेमिकंडक्टर मिशन आदींमुळे उद्योगांच्या थेट उपयोगाच्या संशोधनामध्ये वाढ झाली आहे.

प्रमुख संशोधन संस्था

  • राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)

  • राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)

  • राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एसीसीएस)

  • राष्ट्रीय खगोलभौतिकी आणि खगोलशास्त्र संस्था (एनसीआरए)

  • आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका)

  • भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर)

  • प्रगत संगणन अध्ययन केंद्र (सी-डॅक)

  • सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)

  • भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम)

  • केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडब्लूपीआर)

  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

  • आघारकर संशोधन संस्था

  • डेक्कन कॉलेज

  • गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था

  • ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)

  • राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर

पुणे केवळ ज्ञाननिर्मितीचे केंद्र राहिलेले नाही. तर ते नवतंत्रज्ञानाची विकासाशी सांगड घालणारे शहर झाले आहे. संशोधन संस्थांतील विज्ञान अभियांत्रिकीच्या जोडीने आणि उद्योगांच्या सहकार्याने आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्न करत आहे. मूलभूत संशोधनाच्या पुढे जात उद्योगांच्या सहकार्याने केवळ आयटी नव्हे तर उत्पादन क्षेत्रातही अनेक उपयोजित संशोधने आणि त्यांचा विकास येथे होत असून, भविष्यकालीन तंत्रज्ञानाद्वारे कुशल मनुष्यबळ निर्मिती आणि रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करण्याची क्षमता शहरात आहे. मात्र अजूनही उपयोजित विज्ञानासह महिलांच्या रोजगारक्षमतेच्या विकासावर आपल्याला काम करावे लागेल.

- प्रा. डॉ. सतीशचंद्र ओगले, पदार्थविज्ञानातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, आयसर

कोरोनाकाळात संशोधन संस्थांच्या सहकार्याने पुणे शहरात सिरो सर्वेचे काम झाले. प्रशासनाला अधिक शास्रीय पद्धतीने निर्णय घेण्यासाठी आवश्यक डेटा आणि निष्कर्ष पुरविण्याचे काम पुणे नॉलेज क्लस्टर करत आहे. लोकांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासन, उद्योग आणि संशोधन संस्थामध्ये सांगड घालण्याचे काम होत आहे. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, उद्योग आदी क्षेत्रात संशोधन संस्थांच्या प्रत्यक्ष सहभाग वाढवत शाश्वत विकासाची आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या काळात हा सहभाग वेगाने वाढत जाईल.

- डॉ. प्रिया नागराजन, मुख्य संचालन अधिकारी, पुणे नॉलेज क्लस्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com