पथ विभागाच्या १०२ पैकी आठच निविदांना गती

पथ विभागाच्या १०२ पैकी आठच निविदांना गती
Published on

पुणे, ता. १२ : महापालिकेचा कारभार गतिमान असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी, सत्ताधारी करतात. प्रत्यक्षात निविदा प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने निश्‍चित केलेल्या अटी-शर्ती, ठेकेदारांमधील वाद आणि अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यामुळे कामांची गती संथ झाली आहे. शहरात मोठमोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असताना १०२ पैकी केवळ आठ निविदांनाच गती मिळाल्याने पथ विभागाचा सुमार कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील विकासकामे व देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. पूर्वगणनपत्रक तयार केल्यानंतर प्रशासकीय समिती, वित्तीय समितीची मान्यता घेऊन निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाते. दोन-तीन आठवड्यांत निविदा मागविल्यानंतर अधिकारी कागदपत्रांची छाननी करण्यासाठी ‘अ’ पाकीट उघडतात. त्यात अटी व शर्तींनुसार ठेकेदाराचा अनुभव, आर्थिक क्षमता, प्रकल्पाची व अन्य कामांची क्षमता पूर्ण होते का? याची पडताळणी करतात. यात पात्र ठरणाऱ्या ठेकेदारांनी भरलेले आर्थिकविषयक ‘ब’ पाकीट उघडतात. त्यामध्ये सर्वांत कमी खर्चात काम करण्यास तयार असणाऱ्या ठेकेदाराला काम दिले जाते.
ही प्रचलित पद्धत असली तरी महापालिकेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) नियमावलीचे उल्लंघन करून
अटी-शर्तींमध्ये बदल केला जात आहे. त्यामुळे वाद निर्माण होऊन ठेकेदारांना पात्र-अपात्रतेचा निर्णय न घेता अनेक महिने निविदा खोळंबून ठेवल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून चुकीच्या ठेकेदाराला पात्र केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी केला आहे.
एक एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत पथ, भवन रचना, विद्युत आणि मलनिःसारण या चार विभागांनी ३१९ निविदा काढल्या. त्यापैकी २३३ निविदांचे ‘अ’ पाकीट आणि ८६ निविदांचे ‘ब’ पाकीट उघडले आहे. यामध्ये पथ विभागाच्या केवळ आठ, भवन विभागाच्या पाच, विद्युत विभागाच्या ६९ आणि मलनिःसारण विभागाच्या चार निविदांचा समावेश आहे.

निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘सीव्हीसी’ नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी आवश्‍यक आहे. सध्या काही अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने निविदा रखडल्या आहेत. ‘अ’ पाकीट उघडल्यानंतर १५ दिवसांच्या आत ‘ब’ पाकीट उघडणे, ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून अटी-शर्ती शिथिल न करणे, चुकीची कागदपत्रे देणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे अशा सुधारणा करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
- नीलेश निकम,
विरोधी पक्षनेते, पुणे महापालिका


अशी आहे निविदांबाबतची स्थिती
विभाग निविदांची संख्या ‘अ’ पाकीट उघडले ‘ब’ पाकीट उघडले (टक्केवारी)
पथ - १०२ - ९४ - ८ (७.८४)
भवन रचना - ३३ - २८ - ५ (१५.१५)
विद्युत - १६२ - ९३ - ६९ (४२.५९)
मलनिःसारण - २२ - १८ - ४ (१८.१८)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com