
Pune : बेवारस बालक, परमेश्वराचा अवतार- दत्तराज सिन्नरकर यांचे मत
तळेगाव - बळेगाव (पैठण) येथील चक्रधर स्वामी मंदिराच्या परिसरात अवघ्या तीन तास जन्मलेल्या व जन्म होताच त्याच्या मातेने कचराकुंडीत टाकून दिलेल्या बेवारस बालकाचे अधिकृतपणे संगोपन करून, नुकताच पहिला वाढदिवस साजरा करून त्याचे नामकरण करण्यात आले आहे.
बेवारस असलेले बालक आमच्या दृष्टीने परमेश्वराचा अवतारच आहे असे मत कासारी (माळवाडी, ता. शिरूर) येथील श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे महंत दत्तराज बाबा सिन्नरकर यांनी व्यक्त केले.
येथील श्रीकृष्ण मंदिरातील दहा तपस्विनी महिला चक्क त्या बालकाच्या माता झाल्या आहेत. या माता सदर बालकाचे परमेश्वराचा अवतार म्हणून पालन पोषण करीत असून, दत्तराज सिन्नरकर व सुदर्शन सिन्नरकर यांच्या सानिध्यात बालकाचे संगोपन करण्यात येत आहे.
सदर बालक आता एक वर्षाचे झाले असून त्याचा नुकताच येथील श्रीकृष्ण मंदिरात वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर मुलाचे वाढदिवसानिमित्त नामकरण करण्यात आले आहे. त्याचे नाव "माहीम दत्तराज सिन्नरकर" असे ठेवण्यात आले. त्याच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील संत, महंत, तपस्विनी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र गुजर, संदीप अंकुळेकर, महिंद्र पंजाबी, वाल्हेराज सिन्नरकर, रमेश विजापूरकर, अनिल पुणेकर, अरुण जयराज, भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे, तळेगाव ढमढेरे येथील सरपंच अंकिता भुजबळ, कासारी गावच्या सरपंच सुनीता भुजबळ, सुखदेव भुजबळ, भाजपचे युवा राज्य कार्यकारणी सदस्य नवनाथ भुजबळ, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र भुजबळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे बालक आता आमचे अधिकृत झाले असून, परमेश्वराचा अवतार म्हणून त्याचे आम्ही संगोपन करीत आहोत. त्याला उच्चशिक्षित करून मोठा अधिकारी करण्याची जिद्द आहे. सदर बालकाचे संगोपन येथील दहा तपस्विनी माता करीत आहेत असे दत्तराज सिन्नरकर यांनी यावेळी सांगितले.
दत्तराज सिन्नरकर हे माहीमचे अधिकृत पालक झाले असून, कासारी ग्रामपंचायतमध्ये माहीम दत्तराज सिन्नरकर अशी त्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. संगोपन केलेल्या माहीमचे उपस्थित मान्यवरांनी उत्साहात स्वागत केले. तसेच त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्तराज सिन्नरकर महाराज यांचे सर्वांनीच विशेष कौतुक करून अभिनंदन केले.