अश्लील फोटो गुगलवर टाकण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी; तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

पिडीत तरुणी व तरुण हे मागील तीन वर्षांपासून खानापूर जवळील एका खाजगी महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होते.

अश्लील फोटो गुगलवर टाकण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी; तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल

किरकटवाडी - फार्मसीला एकत्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तयार झालेली मैत्री, त्यातून वाढलेल्या जवळीकीतून तरुणीला केलेला प्रपोज व तरुणीकडून नकार आल्यानंतर अगोदर काढलेले अश्लील फोटो गुगलवर टाकण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी व मारहाण करणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम मदन पाटील (वय 21, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे.) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पिडीत तरुणी व तरुण हे मागील तीन वर्षांपासून खानापूर जवळील एका खाजगी महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होते. तरुणीबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असताना शुभमने काही गृप फोटो व वैयक्तिक फोटो काढलेले होते, तसेच काही अश्लील फोटोही काढले होते. मैत्री वाढत गेल्यानंतर शुभमने तरुणीला प्रपोज केले त्याला संबंधित तरुणीने, 'अगोदर करिअर कर आणि मग माझ्या घरच्यांकडे लग्नाची मागणी घाल' असे म्हणत नकार दिला.

तरुणीने नकार दिल्यानंतर शुभमने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. व अश्लील फोटो तरुणीचा भाऊ,आई, वडील तसेच इतरांना पाठविण्याची वारंवार धमकी दिली. एवढेच नाही तर अश्लील फोटो गुगलवर टाकण्याची धमकी देत तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली. तरुणाकडून होणारा त्रास वाढत गेल्याने अखेर तरुणीने हवेली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. सध्या शुभम पाटील फरार झाला असून हवेली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते याबाबत अधिक तपास करीत आहेत.