

पुणे, ता. १८ : टिंबर मार्केटमधील आगीच्या दुर्घटनेवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज जोरदार गदारोळ झाला. नागझरी नाल्यावरील कल्व्हर्टच्या संथ कामामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप करत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरसेवकांनी केली. विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर आंदोलन केले. सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही या मागणीला पाठिंबा दिला.
टिंबर मार्केट परिसरात नागझरी नाल्यावर एम. बी. पाटील या ठेकेदारामार्फत कल्व्हर्टचे काम सुरू आहे. हे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून, वारंवार पाठपुरावा करूनही ठेकेदाराकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. आगीच्या वेळी अपूर्ण कामामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना मोठा वळसा घालून घटनास्थळी जावे लागले. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आणि ४५ दुकाने जळून खाक झाली, असा दावा नगरसेवकांनी केला. गणेश कल्याणकर, अजय खडेकर, ऐश्वर्या थोरात यांच्यासह अन्य सदस्यांनी ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला तातडीने काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रशासनाची बाजू मांडली. संबंधित ठेकेदाराला थेट काळ्या यादीत टाकता येणार नाही. त्याच्या कामाची अधिकृत मुदत अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे नियमांच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या या स्पष्टीकरणामुळे ठेकेदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीची धार काहीशी बोथट झाली.
राजाभाऊ लायगुडेंचा घरचा आहेर
टिंबर मार्केट दुर्घटनेवरून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यांनी केली होती. मात्र, भाजपचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी याच ठेकेदाराची पाठराखण केली. ठेकेदार चांगले असून, त्यांना आपल्या प्रभागातील रस्त्यांची कामे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्याच नगरसेवकांना लायगुडे यांनी घरचा आहेर दिल्याची चर्चा सभागृहात रंगली.
विरोधकांमध्येच एकजुटीचा अभाव
महापालिकेच्या सभागृहात टिंबर मार्केट दुर्घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणातील पुण्याची घसरण झाल्याच्या मुद्द्यावर स्वतंत्र आंदोलन केले. स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराची आठव्या क्रमांकावरून बाराव्या क्रमांकावर घसरण झाल्याने त्यांनी महापौरांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. दुसरीकडे, कोंढवा परिसरातील नगरसेवकांनी कोंढवा-शिवणेनगर येथील विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्वतंत्र आंदोलन छेडले. एकाच सभागृहात तीन वेगवेगळ्या विषयांवर आंदोलने झाल्याने विरोधकांमध्येच एकजूट नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.