टिंबर मार्केटची सुरक्षा ऐरणीवर महापौरांकडून घटनास्थळाची पाहणी; प्रशासनाला सुधारणांचे आदेश

टिंबर मार्केटची सुरक्षा ऐरणीवर
महापौरांकडून घटनास्थळाची पाहणी; प्रशासनाला सुधारणांचे आदेश
Published on: 

पुणे, ता. १८ : शहरातील मध्यवर्ती भागातील टिंबर मार्केट येथे लागलेल्या भीषण आगीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या घटनेमुळे टिंबर मार्केट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने या परिसरात तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, असे स्पष्ट आदेश महापौरांनी दिले आहेत.
टिंबर मार्केट येथे पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांमध्ये अग्निशामक दलाचे बंब टिंबर मार्केटमध्ये पोहोचले. मात्र, या ठिकाणी नाल्यावर पूल बांधण्याचे काम असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्यांना वळसा घालून त्या ठिकाणी पोहोचावे लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लागलेल्या गाड्या, व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे आग आटोक्यात आणण्याच्या कामामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अग्निशामक दलाचे बंब लावण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने गाड्या लांब उभ्या कराव्या लागल्या. त्याचा देखील परिणाम झाला. या सर्व अडचणींवर मात करत सकाळी १० वाजेपर्यंत या ठिकाणी अग्निशामक दलाचे काम सुरू होते. मात्र, या निमित्ताने टिंबर मार्केट, गंज पेठ या परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
या भागात यापूर्वी ३ ते ४ वेळा आगीच्या घटना घडल्या असूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस रस्ता रुंदीकरण व सुरक्षा उपाययोजना राबवल्या गेल्या नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मार्केटमधील अनेक आस्थापनांचे ‘फायर ऑडिट’ झाले आहे की नाही आणि त्यांना अधिकृत मान्यता आहे का, याची स्पष्टता नाही. तसेच ‘इलेक्ट्रिक ऑडिट’ करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याशिवाय, थंडीचे दिवस सुरू होत असल्याने रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवण्याचे प्रमाण वाढते; लाकडाचा प्रचंड साठा असलेल्या या भागात शेकोटी पेटविल्यामुळे आग भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘‘टिंबर मार्केट येथे लागलेल्या आगीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने या परिसरात सुधारणा कराव्यात, असे आदेश देण्यात आलेले आहेत.
-मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका

‘‘टिंबर मार्केट भागामध्ये लाकडाचा बाजार असल्याने येथे आग लागू नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. या ठिकाणच्या व्यावसायिकांनी त्यांचे फायर ऑडिट करून घ्यावे. तसेच या भागातील अतिक्रमण व अरुंद रस्त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या ठिकाणचे रस्ते रुंद होणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी देखील शेकोटी व अन्य कारणामुळे आग भडकणार नाही याची काळजी घ्यावी.
- गणेश सोनोने, प्रमुख अग्निशामक अधिकारी
--------------------------
(टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव....वृत्त टुडेमध्ये)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.