Pune : चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी, पुल पाडण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी, पुल पाडण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी जोरात

पुणे : चांदणी चौक येथील एन डी ए - बावधन जुना पुल पाडण्यासाठी आवश्यक पूर्व तयारीचे एकीकडे काम वेगात सुरू आहे. तर दुसरीकडे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी अजून हि कायम आहे. सातारा व मुंबईक्या दिशेने ये - जा करणाऱ्या दोन्ही मार्गावर सध्या वाहतूक कोंडी असून वाहनांना अर्धा ते एक तास इतका वेळ चांदणी चौकातून पुढे जाण्यासाठी लागत आहे.

वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने चांदणी चौक येथील एनडीए बावधन जुना पूल रविवारी पहाटे (ता.2) पाडण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग महामंडळ यांच्याकडून पुलाच्या ठिकाणी पूर्व तयारी केली जात आहे. हे काम वेगात सुरू असल्याने चांदणी चौकातून साताऱ्याकडे जाणारी व साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. पुलाभोवतीचे खडक फोडण्याचे काम 10 ते 15 जेसीबी यंत्राच्या माध्यमातून सुरू आहे. तर निघालेली दगड, माती बाजूला काढण्याचे, तेथून हलविण्याचे कामही वेगात सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या या कामामुळे चांदणी चौकातील एक लेन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या दूर पर्यंत रांगा लागल्याची सद्यस्थिती आहे.

बावधन बुद्रुक येथील चेलाराम हॉस्पिटल पासून चांदणी चौक पर्यंत वाहतूक कोंडी आहे. मोठ्या वाहनांना चांदणी चौकात येण्यासाठी किमान अर्धा ते एक तास लागत आहे. तर वाहतूक कोंडी पाहून काही नागरीक महामार्गावरून वाहने वळवून उलट्या दिशेने जीवघेणा प्रवास करीत पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर

पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त भोईटे, बावधन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी सध्या चांदणी चौकातील रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करीत आहेत. याबरोबरच वाहतुकीला अडथळा ठरणारे कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देत आहेत.