पुण्यात वाहतूक कोंडी कशी फुटणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

पुण्यात वाहतूक कोंडी का होते, कारणे काय आहेत अन्‌ उपाययोजना कोणत्या हव्यात, याबाबतचा हा आढावा.

विद्येचे... कला-संस्कृतीचे... ‘आयटी’चे माहेरघर... स्मार्ट सिटी अशी बहुविध ओळख असलेल्या पुणे शहराने आता सर्वाधिक कोंडी असलेल्या जगातील शहरांमध्ये पाचवा क्रमांक पटकाविल्याचे ‘टॉमटॉम’ या बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. पुण्यात वाहतूक कोंडी का होते, कारणे काय आहेत अन्‌ उपाययोजना कोणत्या हव्यात, याबाबतचा हा आढावा. कोंडी फोडण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधांची गरज असून, राजकीय इच्छाशक्तीबरोबरच प्रशासकीय इच्छाशक्तीचाही कस आता लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

का होते पुण्यात वाहतूक कोंडी?
    शहराच्या मध्यभागातील अरुंद रस्ते 
    खासगी वाहनांची वाढती संख्या 
    सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव 
    वाहनचालकांची बेशिस्त 
    नियमनापेक्षा कारवाईवर वाहतूक पोलिसांचा भर

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यावश्‍यक आहे. बस, बीआरटी, मेट्रो, ट्राम आदींचा त्यात समावेश आहे. तसेच पार्किंग मॅनेजमेंट प्रभावी हवी. रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांसाठी जास्त शुल्क घेणे गरजेचे आहे. पार्किंग ही सुविधा मोफत देऊ नये. पादचारीपूरक वाहतूक योजनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उदा. सायकल ट्रॅक. हे ट्रॅक पुरेसे रुंद आणि सलग असले पाहिजेत. तसेच रुंद पदपथ हवेत. 
- प्रतापसिंह भोसले, अर्बन ट्रान्स्पोर्ट प्लॅनर

रखडलेले प्रकल्प 
 बीआरटी -
मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावर बंद, सातारा रस्त्यावर दुरुस्तीचे काम मंद गतीने, हडपसर रस्त्यावर काम सुरू व्हायचे आहे, फक्त संगमवाडी-विश्रांतवाडी यादरम्यान बीआरटी सुरू 

 मेट्रो - वनाज-रामवाडी, पिंपरी-स्वारगेट या अनुक्रमे १५ आणि १६ किलोमीटरवर मार्गांचे काम सुरू. मेट्रोच्या कामांचा सध्याचा वेग पाहता प्रकल्प पूर्ण होण्यास किमान आणखी तीन वर्षे लागणार

 रिंग रोड - रिंग रोड हा रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) का पीएमआरडीएचा करायचा, यावरच अजून खल सुरू आहे 

 लोकल - लोणावळा-दौंड या मार्गावर लोकल सुरू होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचा पाठपुरावा कमी पडत आहे. त्यामुळे चर्चेत असूनही हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही 

 जलवाहतूक - राज्य सरकारने प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली, तर महापालिकेने तो अद्याप पाठविलेला नाही 

  काय आहे ‘टॉमटॉम’च्या अहवालात...
    ‘टॉमटॉम’ या बहुराष्ट्रीय कंपनीने ५७ देशांमधील ४१६ शहरांमधील वाहतुकीचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यात सर्वाधिक कोंडी असलेल्या शहरांत बंगळुरू प्रथम क्रमांकावर असून, मनिला (फिलिपाइन्स) दुसऱ्या, बोगोटा (कोलंबिया) तिसऱ्या, तर मुंबई चौथ्या आणि पुणे पाचव्या क्रमांकावर आहे
    वाहतूक कोंडीमध्ये पुणेकर १९३ तास म्हणजेच दरवर्षी ८ दिवस १ तास घालवतात
    शहरात सर्वाधिक कोंडी (सुमारे ९३ टक्के) गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजी, तर २७ ऑक्‍टोबर रोजी सर्वांत कमी (सुमारे ३० टक्के) होती 
    ‘टॉमटॉम’च्या यादीत सर्वाधिक कोंडी असलेल्या पहिल्या दहा शहरांत भारताची आघाडी असून बंगळुरू (७१ टक्के), मुंबई (६५ टक्के), पुणे (५९ टक्के) आणि नवी दिल्ली (५६ टक्के) या शहरांचा समावेश आहे.  

     हायपर लूप - प्रकल्पाचा खर्च जास्त असल्यामुळे नव्या राज्य सरकारने तो रद्द करण्याचे संकेत दिले आहेत 

     हडपसर रेल्वे स्थानक - पुणे रेल्वे स्थानकावरून नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हडपसर स्थानक सुरू होणे गरजेचे. परंतु, लाल फितीमध्ये अडकल्यामुळे हडपसर स्थानकाचे काम रखडले आहे

     एचसीएमटीआर - महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल राज्य सरकारचे मत नकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सांगितले. त्यामुळे प्रकल्पाबद्दल अनिश्‍चितता.

  प्रमुख उपाययोजना 
    शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे 
    मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करणे 
    प्रमुख रस्त्यांवर बीआरटीच्या मार्गांची निर्मिती करणे 
    शहराच्या मध्यभागातील अरुंद रस्ते रुंद करणे 
    खासगी वाहनांची संख्या मर्यादेत राहण्यासाठी जागरूकता निर्माण करणे 
    लोकसंख्या, वाहनांची संख्या या प्रमाणात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिस उपलब्ध करणे 

  कोंडी कशी टाळाल...
    निघण्यापूर्वी कोणत्या रस्त्याने जायचे, त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करा 
    मदतीसाठी तंत्रज्ञानावर विश्‍वास ठेवा 
    राइड शेअर, बस, मेट्रो, सायकल या पर्यायांचा वापर करण्याची तयारी ठेवा 
    कामाच्या ठिकाणाजवळ राहता येईल असे नियोजन करा 

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था, हा विचार करून स्वयंपूर्ण टाऊनशिपची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वाहतूक कमी होऊन कोंडीही कमी होऊ शकते. तसेच मेट्रो, बस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. वाहतुकीसाठी असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नव्या कायद्याची कठोर अंमलबजावणी झाल्यास वाहतुकीला शिस्त लागेल. 
- प्रदीप भार्गव, अध्यक्ष,  मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर

वाहनांची संख्या सुमारे -  ३८.८८ लाख ( दुचाकी २८ लाख ५७ हजार, चारचाकी १० लाख ३१ हजार )
वाहतूक नियंत्रक दिवे - ३१२
२०१९ मध्ये झालेला दंड - १११ कोटी 
वाहनांची रोजची नोंदणी  - ५८०  (४५० दुचाकी, ८० मोटारी, ५० इतर वाहने (अंदाज))
रस्त्यांची लांबी - १४०० कि.मी.
बसची संख्या - १५५० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune traffic issue