Pune : BRT वर खापर का फोडता ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BRT

Pune : BRT वर खापर का फोडता !

पुण्यातील बीआरटी मार्ग काढून टाकल्याने वाहतूक कोंडी कमी होईल, असे म्हणणे म्हणजे साप समजून भुई धोपटत बसण्यासारखे आहे. पीएमपी अधिक सक्षमपणे चालावी किंवा वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कधीही गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत. तेच ‘बीआरटी’ काढा अशी अतार्किक मागणी करीत आहेत.

- संभाजी पाटील

@psambhajisakal

पुण्यात वाहतुकीची समस्या एका दिवसात तयार झालेली नाही. नागपूर अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडणारे आणि त्यावर बोलणारे लोकप्रतिनिधी महापालिकेत नगरसेवक असताना, त्यांच्या हातात महापालिकेची सत्ता असल्यापासून हा प्रश्न गंभीर होता. महापालिकेच्या पातळीवरच हा प्रश्न नियोजनबद्ध रीतीने सोडवला असता तर विधानसभेत त्यावर चर्चा करण्याची गरज भासली नसती.

पुण्यातील आमदार महोदयांनी या प्रश्नाच्या मुळाशी न जाता थेट बीआरटी हटवा अशी मागणी केली. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी कोणत्या पर्यायांचा विचार केला होता, हे माहिती नाही. मुळात २० किलोमीटर अंतरावरील बीआरटी मार्ग बंद करून ११०० किलोमीटरच्या शहरातील रस्त्यांवरील कोंडी दूर होणार का?, हा खरा प्रश्न आहे.

पुण्यातील बीआरटी नक्कीच सदोष आहे. २००७ मध्ये कात्रज-स्वारगेट-हडपसर हा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग पथदर्शी बीआरटीसाठी निवडला होता.

सुरवातीच्या काळात या दोन्हीही मार्गावर व्यवस्थित बस सेवा देण्यात आली. त्याचा लाभ लाखो प्रवाशांना झाला, त्यांचा वेळ वाचला. मात्र बीआरटीबाबत लोकप्रतिनिधी कधीही सकारात्मक दिसले नाहीत. बीआरटीमधील त्रुटी दूर करून ही सेवा अधिकाधिक सक्षम कशी होईल, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महापालिकेच्या सर्वसाधारणसभेतही बीआरटी केवल टीकेचा विषय बनवण्यात आला. त्यामुळे बीआरटी मार्गातील त्रुटी दूर झाल्याच नाहीत; पण जे मार्ग व्यवस्थित सुरू होते त्यातही अनेक अडथळे आले आणि त्यातील काही मार्ग पूर्णपणे बंद पडले.

गेल्या १५ वर्षांपासून इथल्या कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना बीआरटी धड राबवता आली नाही. अगदी वर्षभरापूर्वी सातारा रस्त्यावरील बीआरटीवर पुन्हा १००-१५० कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र तीही नीट सुरू करता आली नाही. मुळात २० किलोमीटर अंतरावर बीआरटी आहे. ती बंद केल्यास शेकडो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कशी दूर होणार? विद्यापीठ रस्ता, कात्रज-देहूरोड, कर्वे रोड इथे कुठे बीआरटी आहे.

तेथे का कोंडी होते, याचे उत्तर बीआरटी नको म्हणणारे देतील का? बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी करणाऱ्यांनी प्रवाशांसाठी आवश्यक सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल यासाठी प्रयत्न केलेला दिसत नाही. सातारा रस्त्यावर १०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी खर्च होत असताना लोकप्रतिनिधी कोठे होते? हा खर्च होताना कोणीही आक्षेप का घेतला नाही, हा प्रश्न आहे.

तत्कालीन आमदार गिरीश बापट आणि अनंत गाडगीळ यांनी पीएमपी बसखरेदीसाठी आमदार निधी खर्च केला होता. गेल्या पाच वर्षांत किती आमदारांनी बस खरेदीसाठी निधी दिला? वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केला. प्रशासनाच्या मागे लागून वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी वेळ दिला, बीआरटीमध्ये बसची वारंवारता वाढेल यासाठी प्रयत्न केले, हेही पुणेकरांना समजायला हवे.

बीआरटी मार्ग बंद करणे सोपे आहे, पण त्यासाठी खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांची जबाबदारी कोणाची असेल. बीआरटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काय होणार आणि बीआरटी मार्ग बंद केल्याने रस्त्यावरील खासगी वाहने कमी होणार आहेत का?, याचा विचार व्हायला हवा. मूळ प्रश्नाला बगल देऊन हाती काहीच लागणार नाही.

पुण्यातील वाहतूक

पीएमपीची दररोजची प्रवासी संख्या : १० ते १२ लाख

पीएमपीची एकूण बस संख्या : १६५०

खासगी वाहने : ३१ लाख

हे नक्की करा...

बीआरटी मार्गावर वाहतुकीचे योग्य नियोजन

बीआरटीमधील त्रुटी दूर करा.

बसची वारंवारता वाढवा.