#PuneTraffic समस्यांच्या विळख्यात सिंहगड रस्ता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे - अर्धवट अवस्थेतील पर्यायी रस्ता, जागोजागी असलेली अतिक्रमणे आणि बिनधास्त उलट दिशेने सुसाट वेगाने वाहन चालवीत येणारे दुचाकीस्वार या समस्येच्या त्रिकोणात तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) अडकला आहे. धायरी फाटा ते छत्रपती राजाराम पूल जेमतेम पाच किलोमीटर अंतरासाठी सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत तब्बल ४० मिनिटे लागतात. 

पुणे - अर्धवट अवस्थेतील पर्यायी रस्ता, जागोजागी असलेली अतिक्रमणे आणि बिनधास्त उलट दिशेने सुसाट वेगाने वाहन चालवीत येणारे दुचाकीस्वार या समस्येच्या त्रिकोणात तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) अडकला आहे. धायरी फाटा ते छत्रपती राजाराम पूल जेमतेम पाच किलोमीटर अंतरासाठी सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत तब्बल ४० मिनिटे लागतात. 

जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पदपथावरूनही दुचाकी जात असल्याने या रस्त्यावरून चालणे तर दुरापास्त झाले आहेच, पण त्या वाहनांच्या गर्दीतून रुग्णवाहिकाही लवकर वाट काढू शकत नाही, अशी भीषण स्थिती असल्याचे सोमवारी (ता.२२) ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून समोर आले. 

धायरी फाट्यावरील कै. रमेश वांजळे पूल ते राजाराम पुलापर्यंत सकाळी साडेनऊ वाजता पाहणी करण्यात आली. कार्यालयात जाण्याच्या वेळेला स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तुफान गर्दी असते, तर संध्याकाळी धायरीच्या दिशेने येणारे, रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीत गुदमरलेले असतात. वांजळे पुलाखालून सर्रास उलट्या दिशेने वाहने दामटत असतात. त्याला कोणाचेच निर्बंध नसते. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते.

वांजळे पुलाच्या खाली वाहतुकीच्या कोंडीमुळे धायरी गावात जाणारा रस्ता पूर्ण बंद होतो. त्यामुळे सकाळी नऊ वाजता धायरी गावातून दुचाकीवर कार्यालयात जायला निघालेल्या कर्मचाऱ्याची पहिली पंधरा ते वीस मिनिटे याच चौकात जातात. किमान दोन वेळा सिग्नलला थांबल्याशिवाय वडगाव पुलाच्या खालून पुढे जाता येत नाही. माणिकबाग ओलांडताना वाट मिळेल तेथून गाडी दामटत कसाबसा सुटलेला दुचाकीस्वार, संतोष हॉलजवळील भा. द. खेर चौकात हमखास थांबतो. या सिग्नलची गर्दी न्यू पूना बेकरीच्या पुढेपर्यंत आलेली असते. किमान सिग्नलपर्यंत पोचण्यासाठी न्यू पूना बेकरीच्या समोरील पदपथावरूनही आपण वाहन चालवत आहोत, याची भीड तो बाळगत नाही. तीन ते चार सिग्नलमधून संतोष हॉल चौक ओलांडेपर्यंत घरातून निघून त्याला अर्धा तास झालेला असतो. हिंगणे, दामोदरनगर येथून सिंहगड रस्त्याला लागणाऱ्या वाहन चालकाची गर्दी हिंगणे चौकात असते. 

धायरी फाट्यापासून ३० मिनिटांमध्ये राजाराम पुलापर्यंत पोचणे हे मोठे दिव्य असते. हे अंतर वेळेत पार केले की, मग कार्यालयात वेळेत पोचू असा विश्‍वास वाटतो.
- उमेश पाटील, नागरिक, धायरी 

पर्यायी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई यात त्रिसूत्रीतून सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी फोडता येईल.
- संतोष काशीद, माणिकबाग

Web Title: pune traffic Sinhagad Road issue