पुण्यात तलावाजवळ फेकलेल्या जुळ्यांचे आई-वडील सापडले; बाळांची आई विधवा

टीम ई-सकाळ
बुधवार, 22 जानेवारी 2020

पुण्यात 14 जानेवारी रोजी सकाळी पाषाण तलावाजवळ दोन जुळी मुलं सापडली होती. तलाव परिसरातील सुरक्षा रक्षकांना ही मुलं सापडली होती.

पुणे : आठ दिवसांपूर्वी पुण्यातील पाषाण तलावाजवळ सकाळ-सकाळी दोन जुळी मुलं सापडली होती. अज्ञात आई-वडिलांनी त्यांना तलावाजवळ सोडले होते. त्या जुळ्या मुलांच्या आई-वडिलांना शोधण्यात चतुःश्रृंगी पोलिसांना यश आलंय. प्रेमप्रकरणातून या बाळांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे.  संतोष नागनाथ वाघमारे (वय ३०, रा. घुले नगर वडगाव बुद्रुक ता. हवेली) असे आरोपी प्रियकराचे नावे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात 14 जानेवारी रोजी सकाळी पाषाण तलावाजवळ दोन जुळी मुलं सापडली होती. तलाव परिसरातील सुरक्षा रक्षकांना ही मुलं सापडली होती. ससून रुग्णालयात त्यांची रवानगी करण्यात आली होती. पण, या मुलांचे आई-वडील कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मुलांच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. आठ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना बाळांच्या आई-वडिलांना पकडण्यात यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार धायरी परिसरात संबंधित आई-वडील लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. संबंधित महिला विधवा आहे. तिला आधीच तीन मुली आहेत. त्यानंतर या दोन जुळ्या बाळांचा जन्म झाला. त्यामुळं त्यांनी दोन्ही बाळांना तलावाजवळ सोडल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून बाळांचे आई-वडील दोघांनाही ताब्यात घेतले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी असा घेतला शोध 
तलावाजवळ सापडलेल्या दोन जुळ्या मुलांमुळे पोलिसांचे ह्दयही हेलावले. त्यातूनच पोलिसांनी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या आई-वडिलाचा शोध घेण्याचे ठरविले. प्रारंभी शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला, याचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानुसार, वाकड, हिंजवडी, वडगाव, कात्रज या परिसरातील रुग्णालयांमध्ये शोध घेतला. त्या वेळी वारजे येथील एका रुग्णालयामध्ये जुळ्या मुलांचा जन्म झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा पत्ता मिळवून शोध घेतला. मात्र, संबधित व्यक्ती सातत्याने घर बदलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अखेर मोबाईल लोकेशन व अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. रिक्षाचालक व एका महिलेच्या प्रेमसंबंधातून जुळ्या बाळांचा जन्म झाला होता. त्यांना बाळाला सांभाळायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी दोन्ही जुळ्या मुलांना तलावाच्याकडेला फेकून दिले. दरम्यान, या शोधासाठी सहा पोलिस अधिकारी कर्मचारी आठ दिवसांपासून शोध घेत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune twin babies found at pashan lake mother father caught by police