Pune : अनाधिकृत फ्लेक्सला अधिकाऱ्यांचे अभय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : अनाधिकृत फ्लेक्सला अधिकाऱ्यांचे अभय

शिवाजीनगर : सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स लावणे कायद्याने गुन्हा आहे.असे उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील या आदेशाचे सर्हास उल्लंघन केले जाते. राजकीय नेत्यांचा वाढदिवस असो अथवा नवीन व्यवसायाचे उदघाटन यासाठी सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृत फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोथरूड, शिवाजीनगर, एरंडवणे या भागातील मुख्य रस्ते गोपाळकृष्ण गोखले रस्ता, कर्वे रस्ता, पौंड रस्ता,विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, एरंडवणे या परिसरात रस्त्यावर असलेल्या वीजेच्या व सिंग्नलच्या खांबावर हे अनाधिकृत फ्लेक्स लटकवले जातात. फ्लेक्स मुळे वाहतूकीस अडथळा होऊन नागरिकांना सिंग्नल देखील व्यवस्थित दिसत नाहीत. जेष्ठ नागरिकांना पदपथावर चालणे देखील मुश्कील होत आहे.

अनाधिकृत फ्लेक्स ठराविक राजकीय कार्यकर्त्यांचे नियमित दिसून येतात.महापालिका आकाशचिन्ह परवाना विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. शहराचे विद्रूपीकरण करणारे हे अनाधिकृत फ्लेक्स नेहमी लावले जातात.महापालिकेचे अधिकारी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत आहेत.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असते की हे अनाधिकृत फ्लेक्स कुठे लावले आहेत.तरी देखील कारवाई केली जात नाही. पायी चालणारे नागरिक आणि वाहनधारक यांना या फ्लेक्सच्या समस्येला सामोरे जावे लागते.

- सदस्य डेक्कन जिमखाना परिसर समिती सुमिता काळे

जोपर्यंत पुणे महापालिका फ्लेक्स संदर्भात निश्चित धोरण अवलंबत नाही, तोपर्यंत अनधिकृत फ्लेक्स लागतच राहणार. केवळ राजकीय मंडळींचेच नव्हे तर व्यवसायिक, सामाजिक संस्था यांचे देखील फ्लेक्स सर्रास दिसून येतात. शनिवार, रविवारी याचे प्रमाण जास्त असते. महापालिकेने फ्लेक्स संदर्भात निश्चित धोरण अवलंबले तरच हे शक्य आहे. केवळ घोषणाबाजी करून फ्लेक्स हटणार नाहीत. उच्च न्यायालयाचे निर्णय असताना देखील, आपण सगळीकडे फ्लेक्स पाहू शकतो. ज्यांनी कारवाई करायचे असते ते कुठेतरी कमी पडत आहेत.

- अध्यक्ष क्रिएटिव फाउंडेशन संदीप खर्डेकर

दररोज किमान ८० अनाधिकृत फ्लेक्सवर करावाई करतो.

नोव्हेंबर महिन्यात दंडाच्या माध्यमातून चार हजार रूपये वसूल केले आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने कारवाई करण्यास मर्यादा येते.

- आकाशचिन्ह परवाना निरीक्षक कोथरूड क्षेत्रीय कार्यालय संतोष गोंधळेकर

आम्ही नियमित कारवाई करत असतो.शिवाजीनगर भागात जवळपास वीस ते पंचवीस अनाधिकृत फ्लेक्स लावणारावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र देखील संबंधित पोलिस चौकीला दिले आहेत.

मिलींद काळोखे आकाशचिन्ह परवाना निरीक्षक शिवाजीनगर - घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय.