Pune : पुणे विद्यापीठाच्या नवनिर्वाचितांची आज पहिली सिनेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले विद्यापीठ

Pune : पुणे विद्यापीठाच्या नवनिर्वाचितांची आज पहिली सिनेट

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्वाचित सदस्यांची पहिली अधिसभा (सिनेट) बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. अधिसभेशी संबंधित सर्व घटकांना २१ दिवस आधीच सुचनेद्वारे काळविल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पदवीधर, प्राध्यापक, प्राचार्य गटातील नवनिर्वाचित सदस्यांची ही पहिली अधिसभा, तर वर्षातील दुसरी अधिसभा आहे. राज्यपाल आणि कुलगुरू नामनिर्देशित सदस्यांची निवड अजून बाकी असून, लवकरच या नावाची घोषणा होण्यासाठी अनेक सूत्र प्रयत्नशील आहे. नवनियुक्त अधिसभा सदस्यांमध्ये उत्साह, आनंद आणि नव्या ठारावांची चर्चा पाहायला मिळाली.

प्रभारी कुलगुरूंची अध्यक्षता :

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली हि पहिलीच अधिसभा आहे. या आधी माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल महिन्यात पार पडली होती.

अधिसभा निवडणूक :

यंदा राजकीय पक्षांनी उघडपणे पॅनेल करून उमेदवार अधिसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच निवडणुकीला राजकीय स्वरूप मिळाले होते.भाजपशी संबंधित आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या गटातील उमेदवारांचे ‘विद्यापीठ विकास मंच’ हे पॅनल होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल, आदी पक्ष, संघटनांचे एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते.

विद्यापीठ विकास मंचातर्फे अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातून गणपत नांगरे हे १३ हजार ९९५ मतांनी, भटक्या जमाती (एन.टी) प्रवर्गातून विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी, अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातून राहुल पाखरे हे १३ हजार ५१२ मतांनी, तर इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून सचिन गोर्डे हे १३ हजार ३४२ मतांनी विजयी झाले होते.

महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर या १५ हजार ६४९ अशा सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. खुल्या प्रवर्गात विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस हे पहिल्या फेरीतच खुल्या प्रवर्गातून चार हजार ४४७ मते मिळवून निवडून आले होते.

तसेच खुल्या प्रवर्गातून सागर वैद्य हे तीन हजार ७११ मते मिळवीत पहिल्या फेरीत, तर युवराज नरवडे हे तीन हजार ६८६ मते मिळवत दुसऱ्या फेरीत विजयी झाले आहेत.

प्राचार्य गटासाठीसुद्धा खुल्या गटासाठी निवडणूक पार पडली. यातून निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा विद्यापीठाने केली आहे. एकूण नऊ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य गटाच्या मतदारसंघातून अनुसूचित जाती, विमुक्त किंवा भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि महिला गटात बिनविरोध निवड झाली असून, खुल्यागटातील पाच जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

मतमोजणीनंतर सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन लक्ष्मण घोरपडे, शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र शंकर झुंजारराव, नाशिकच्या महात्मा गांधी विद्यामंदिर फार्मसी कॉलेजचे डॉ. राजेंद्र सुधाकर भांबरे, राहत्यातील प्रवरा महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप मच्छिंद्र दिघे आणि नाशिक जिल्ह्यातील ओझरचे आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेजचे डॉ. संपत सहादराव काळे निवडून आले आहेत.

अनुचित जाती प्रवर्गात डॉ. देविदास भीमराव वायदंडे, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गात नाशिकच्याच मातोश्री अभियांत्रिकीचे डॉ. गजानन काशिराम खराटे, इतर मागास प्रवर्गात रसिकलाल एम.धारीवाल सिंहगड इन्सिट्यूट कॅम्पसचे डॉ. वैभव विठ्ठलराव दिक्षीत आणि महिला गटात डेक्कन जिमखानाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या डॉ. क्रांती देशमुख यांची निवड झाली आहे